मी दलित समाजातील असल्यामुळे मला राम मंदिर ध्वजारोहण कार्यक्रमात बोलावलं नाही, अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांचा आरोप

राम मंदिरात धर्मध्वज प्रतिष्ठापना समारंभाला आमंत्रित न केल्याबद्दल अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “रामललांच्या दरबारातील धर्मध्वज स्थापना कार्यक्रमात मला बोलावले नाही, याचे कारण मी दलित समाजातून येतो हे आहे. ही रामाची मर्यादा नाही, तर दुसऱ्याच्या संकुचित विचारसरणीचे प्रतिबिंब आहे. राम सर्वांचेच आहेत. माझी लढाई कोणत्या पदाची किंवा निमंत्रणाची नाही,तर सम्मान, समता आणि संविधानाच्या मर्यादेची आहे.”

दरम्यान, राम मंदिरात धर्मध्वज प्रतिष्ठापना समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. परंतु स्थानिक खासदारांच्या कार्यक्रमाला अनुपस्थितीमुळे आता वाद निर्माण झाला आहे. अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांना आशा होती की, त्यांना आमंत्रित केले जाईल, परंतु तसे झाले नाही. कार्यक्रमानंतर त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये आपली नाराजी व्यक्त केली आहे.