
दिल्लीतील वीएमएमसी आणि सफदरजंग रुग्णालयाने किडनी प्रत्यारोपण क्षेत्रात ऐतिहासिक यश संपादन केले आहे. 19 नोव्हेंबर 2025 रोजी येथे 11 वर्षीय मुलाचे यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. सफदरजंग रुग्णालयातील हे पहिले बालवैद्यकीय किडनी प्रत्यारोपण असून, देशातील कोणत्याही केंद्रीय सरकारी रुग्णालयात झालेला हा पहिलाच पेडियाट्रिक किडनी ट्रान्सप्लांट मानला जात आहे.
या मुलाला बायलेटरल हायपो-डिस्प्लास्टिक किडनी नावाचा दुर्मीळ आजार होता. दीड वर्षांपूर्वी प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याला कार्डिअॅक अरेस्टही आला होता. तपासणीमध्ये त्याच्या दोन्ही किडन्या पूर्णपणे निकामी झाल्याचे आढळल्याने तो नियमित डायलिसिसवर होता.
युरोलॉजी आणि रीनल ट्रान्सप्लांट विभागाचे संचालक प्रा. डॉ. पवन वासुदेवा यांनी सांगितले की, मुलांमध्ये किडनी प्रत्यारोपण करणे अत्यंत आव्हानात्मक असते. मोठ्या रक्तवाहिन्यांशी किडनी जोडणे आणि प्रौढ किडनीसाठी जागा तयार करणे ही प्रक्रिया गुंतागुंतीची असते. या मुलाला किडनी त्याच्या 35 वर्षीय आईने दान केली. प्रत्यारोपणानंतर किडनी उत्तमपणे कार्यरत असून मुलाला डायलिसिसमुक्त करण्यात आले आहे. लवकरच त्याला घरी सोडण्यात येणार आहे.
मुलाचे कुटुंब उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील असून वडील मजुरी करून उदरनिर्वाह करतात. खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे 15 लाख रुपये झाला असता. आर्थिक परिस्थिती कठीण असल्याने कुटुंबाने आशा जवळजवळ सोडली होती. प्रत्यारोपणानंतर लागणारी महागडी इम्युनोसप्रेसिव्ह औषधे रुग्णालयातर्फे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही कामगिरी केवळ रुग्णालयासाठी नाही तर देशातील सरकारी आरोग्यसेवेसाठीही एक महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे.




























































