अजित पवार म्हणाले रामकृष्ण हरी, लोक म्हणाले वाजवा तुतारी… लक्षात आल्यावर दादांकडून सारवासारव

आपल्या वक्तव्यासाठी चर्चेत असलेले अजित पवारांचे आणखी एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. त्यानंतर त्यांनी याबाबत सारवासारव केल्याचे दिसून आले. नगरपरिषद निवडणुकांसाठी सोमवारी सभांचा धडाका लावलेला दिसून आला. आधी अंबाजोगाई आणि त्यानंतर बीडमध्ये सभा घेतली मात्र या सभेत बोलतांना ‘राम कृष्ण हरी’ असे म्हटल्याने समोरून वाजवा तुतारी असा प्रतिसाद मिळाला. मात्र ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सभा असल्याने त्यांनी त्याबाबत सारवासारव केली.

नगर परिषद निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी रात्री जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी ‘राम कृष्ण हरी’ हा शब्द उच्चारला. यावेळी उपस्थितांपैकी काहींनी वाजवा तुतारी असे म्हणत प्रतिसाद देखील दिला. त्यानंतर आयोजकांकडून एकाने दादांना एक चिठ्ठी लिहून देत या रामकृष्ण हरीचा वेगळा अर्थ निघू शकतो असा निरोप दिला. त्यानंतर पवारांनी सारवा सारव करत आपण संतांच्या भूमितील आहोत त्यामुळे एकमेकांना भेटलो तर राम कृष्ण हरी म्हणतो तुमच्या मनातील शंका दूर करा. याचा कृपया वेगळा अर्थ लावू नका असे स्पष्टीकरण दिले. गत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ‘राम कृष्ण हरी वाजवा तुतारी’ हे ब्रीद वाक्य अंगिकारत प्रचलित केले होते. याचा उपयोग त्यांना बर्‍याच ठिकाणी झालेला दिसून आला होता.