गृह आणि वाहन कर्ज होणार स्वस्त? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी दिले संकेत

सर्वसामान्य जनता आणि कर्जदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नव्याने कर्ज घेणाऱ्या किंवा घर, वाहन खरेदी करणाऱ्या किंवा वैयक्तिक कर्जाचे हप्ते (EMI) सुरू असलेल्या सामान्य नागरिकांचे ईएमआय कमी होण्याची शक्यता आहे.  रिझर्व्ह बँक (RBI) या वर्षाच्या अखेरीस रेपो रेटमध्ये आणखी एक कपात करण्याची शक्यता आहे.

आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी रेपो रेटबाबत संकेत दिले आहेत. पुढील महिन्यात 3 ते 5 डिसेंबर दरम्यान आरबीआयच्या पत धोरण समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत रेपो रेट कपातीसाठी अंतिम निर्णय घेण्यात येईल. ऑक्टोबरमध्ये झालेल्या बैठकीतच दरांमध्ये कपातीचे संकेत देण्यात आले होते. त्यामुळे आगामी बैठकीत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी ते जूनदरम्यान एमपीसीने सुमारे 100 बेसिस पॉइंट्सची कपात केली होती. तसेच ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये रेपो रेट 5.5 टक्क्यांवर स्थिर ठेवला होता.

आता डिसेंबरमध्ये 25 बेसिस पॉइंट्सपर्यंत दर कपात होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे, ऑक्टोबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक आधारित महागाई ०.२५ टक्क्यांपर्यंत घसरली, जी सप्टेंबरमध्ये 1.44 टक्के इतकी होती. रेपो दरात लक्षणीय कपात करण्याबाबत गव्हर्नर म्हणाले की, RBI प्राथमिक उद्दिष्ट किंमतीत स्थिरता आणि दुसरे उद्दिष्ट विकासाला समर्थन देणे आहे. यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार करता बँक आक्रमक किंवा पूर्णपणे बचावात्मक भूमिका घेणार नाही, असे ते म्हणाले.

संजय मल्होत्रा ​​यांनी रुपयाच्या सतत घसरणाऱ्या मूल्यावर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले की, यापूर्वी रुपया दरवर्षी अंदाजे तीन ते साडेतीन टक्क्यांनी घसरला आहे. रुपयाच्या चढउतारांवर नियंत्रित ठेवणे आहे. हेच आरबीआयचे ध्येय आहे. जेणेकरून विनिमय दरात अचानक किंवा तीव्र बदल आर्थिक अस्थिरता निर्माण करू नये.