
एसटी महामंडळाच्या मुंबईतील प्रवासी थांब्यांवर अखेर ‘जय महाराष्ट्र’ झळकले आहे. जाहिरातदारांसाठी बसथांबे आंदण देताना महामंडळाने आपल्या लोगोमध्ये ‘जय महाराष्ट्र’चा उल्लेख वगळला होता. त्यासंदर्भात दै. ‘सामना’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच एसटी महामंडळ ताळय़ावर आले आणि 24 तास उलटण्याआधी शहरातील बस थांब्यांवरील लोगोमध्ये सुधारणा करून ‘जय महाराष्ट्र’चा उल्लेख करण्यात आला.
आठ वर्षांपूर्वी तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी बसगाडय़ांवर तसेच महामंडळाच्या लोगोमध्ये अभिमानाने ‘जय महाराष्ट्र’ लिहिले जाईल, अशी घोषणा केली होती. त्यानंतर एसटी महामंडळाची कार्यालये, बस आगार, प्रवासी थांब्यांवरील लोगोमध्ये ‘जय महाराष्ट्र’ झळकले होते. मात्र महायुती सरकारच्या काळात मुंबईतील एसटीचे प्रवासी थांबे जाहिरातदारांना आंदण देण्यात आले.
शिवसैनिकांची महामार्गावर धडक
‘जय महाराष्ट्र’चा उल्लेख वगळल्याच्या पार्श्वभूमीवर गोरेगाव पूर्वेकडील शिवसेना शाखाप्रमुख संदीप गाढवे यांच्यासह सुभाष जाधव, गणेश घडशी, विजय शर्मा, संजय चौरसिया, मुकेश बागुल, प्रसाद बनसोडे, योगेश कारेलिया, सचिन साळुंखे आदींनी पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रवासी थांब्यांच्या ठिकाणी धडक एसटीचा निषेध केला.


























































