
मोतीलाल नगर नं. 1 येथील रस्ता क्र. 4 च्या काँक्रिटीकरणाचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असून स्थानिकांची मोठी गैरसोय होत आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
गोरेगाव पश्चिम येथील म्हाडा वसाहतीतील रस्ता क्र. 4 चे काम संथगतीने सुरू आहे. वर्षभरापूर्वी सुरुवात करूनही काम पूर्ण झालेले नाही. हा रस्ता ठिकठिकाणी खोदून ठेवल्यामुळे ये-जा करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. खासकरून महिला आणि वृद्धांचे हाल होतात. येथील घरे बैठी असल्याने घरात धुळीचे साम्राज्य पसरले असून रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रहिवाशांना त्यांच्या गाड्यांचे पार्किंग लांब करावे लागते.
शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी महापालिका अधिकाऱ्यांसह नुकतीच या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी शाखा संघटक शोभना सकपाळ, उपशाखाप्रमुख विनोद माने यांच्यासह स्थानिक रहिवासी संगीता चौधरी, सुजाता चौधरी, मीना चौधरी, प्रेमा करंजकर, लीना, नाथन, बबलू चौधरी, विश्वनाथ चौधरी, वर्मा, राजेश सावंत उपस्थित होते.
रस्ता स्थानिकांसाठी की अदानीच्या फायद्यासाठी?
मोतीलाल नगरचा पुनर्विकास अदानी करणार असून पुढच्या वर्षी या कामाला सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षभरापासून या रस्त्याचे संथगतीने सुरू असलेले काम पाहता हा रस्ता स्थानिकांसाठी तयार केला जातोय की अदानीच्या फायद्यासाठी, असा सवाल माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी केला.
महापालिकेने लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करावे तसेच पाणी, ड्रेनेज अशा युटिलिटी वाहिन्या चांगल्या दर्जाच्या बसवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.


























































