
माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई म्हणले की, देशाची न्यायव्यवस्था पूर्णपणे स्वतंत्र असली तरी तिच्या निर्णयांकडे अनेकदा राजकीय चष्म्यातून पाहिले जाते. गवई यांनी एनडीटीव्हीला मुलाखत दिली त्यात त्यांनी हे विधान केले आहे.
गवई म्हणाले की, “आम्ही कोणासमोर पक्षकार म्हणून उभं आहे हे बघून निर्णय देत नाही. आमच्यासमोर ठेवलेल्या मुद्द्यांवरच निर्णय घेतो.” सरकारविषयीचे प्रकरण असो वा विरोधातील, न्यायालयाचा निर्णय हा न्यायनिष्ठतेवर आधारित असतो. “काही प्रकरणांत निर्णय सरकारच्या बाजूने जातात, तर काही वेळा सरकारविरोधातही जातात. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक प्रकरणात सरकारविरोधात निर्णय दिला तरच न्यायाधीश स्वतंत्र ठरतात. अन्यथा न्यायाधीश पक्षपाती ठरतात, ही समजूत चुकीची आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
न्यायालय कोणत्याही दबावाखाली काम करत नाही, असेही गवई यांनी ठामपणे सांगितले. “न्यायाधीश स्वातंत्र्याची शपथ घेतात. संविधान, कर्तव्य आणि घेतलेली शपथ यांच्याशी प्रामाणिक राहूनच आम्ही काम करतो,” असे ते म्हणाले.
राजकीय नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱ्या कारवाईबाबतही त्यांनी भूमिका मांडली. “मी अनेक वेळा उघडपणे ईडीवर टीका केली आहे,” असे गवई म्हणाले. “माझ्या मते, राजकीय लढाया या जनतेसमोर लढल्या पाहिजेत. आणि जेथे मला जाणवले की ईडी असो किंवा पोलिस, कोणत्याही राजकीय कारणांसाठी एखाद्या नेत्याला त्रास देत आहेत, तेथे मी मदत करण्यास क्षणभरही मागेपुढे पाहिले नाही,” असे माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी सांगितले.


























































