देशाचे संविधान आता मराठीसह 9 नवीन भाषांत; राष्ट्रपतींच्या उपस्थितीत प्रकाशन

जगातील सर्वात मोठ्य़ा लोकशाहीला दिशा देणारी राज्यघटना तथा संविधान आता नऊ भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. आजच्या संविधान दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मराठी, मल्याळम, नेपाळी, पंजाबी, बोडो, कश्मिरी, तेलुगु, ओडिया आणि आसामी भाषेतील संविधानाचे प्रकाशन करण्यात आले.

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये हा सोहळा झाला. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि दोन्ही सभागृहांचे खासदार उपस्थित होते. यावेळी भाषण करताना राष्ट्रपती मुर्मू यांनी संविधानाची प्रस्तावना वाचून दाखवली. संसदेने आजवर केलेल्या कामाचा त्यांनी आढावा घेतला.

तेव्हाच्या सरकारने संविधानाचा गौरव केला नाही! – मोदी
संविधान दिनी देशवासीयांना लिहिलेल्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच्या काँग्रेस सरकावर निशाणा साधला. ‘2010 मध्ये संविधानाने 60 वर्षे पूर्ण केली. तो एक महत्त्वाचा टप्पा होता. गुजरातमध्ये आमच्या सरकारने त्यावेळी संविधान गौरव यात्रा काढली होती. दुर्दैवाने त्यावेळी राष्ट्रीय पातळीवर संविधानाचा हवा तसा सन्मान केला गेला नाही,’ अशी खंत मोदी यांनी पत्रात व्यक्त केली.