
वाळू व अन्य गौण खनिजांची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परमिट जागीच रद्द करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. त्याचप्रमाणे पुढील कारवाईसाठी संबंधित वाहनही जप्त केले जाणार आहे.
राज्यात मोठय़ा प्रमाणावर होणाऱ्या वाळू आणि इतर गौण खनिजांच्या चोरीमुळे शासनाच्या महसुलाची आणि पर्यावरणाची मोठी हानी होते. या अवैध व्यवसायातून गुन्हेगारीही वाढत असून कारवाईसाठी जाणाऱ्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्याची गंभीर दखल घेत महसूलमंत्री बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला. गौण खनिजांची अवैध वाहतूक होत असल्याचे कुणाच्याही निदर्शनास आल्यास त्यांनी तातडीने महसूल विभागाला त्याची माहिती द्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याला बक्षिस देण्याचा विचारही महसूल विभाग करत आहे.























































