म्हाडाच्या मुंबईतील 84 दुकानांचा होणार लिलाव, 28 लाखांपासून 10 कोटींपर्यंतच्या दुकानांचा समावेश

म्हाडाच्या मुंबईमधील 84 दुकानांचा लिलाव होणार आहे. ई-लिलावाकरिता ऑनलाइन नोंदणीला उद्या, 27 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात होणार असून 24 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यात अगदी 28 लाखांपासून ते 10 कोटींपर्यंतच्या दुकानांचा समावेश आहे.

मुंबईतील 84 दुकानांचा या लिलावात मुलुंड गव्हाणपाडातील 4, कुर्ला-स्वदेशी मिलमधील 5, कोपरी पवईतील 15, मॉडेल टाऊन मजासवाडी आणि गोरेगाव पश्चिम सिद्धार्थ नगर येथील प्रत्येकी एक, गोरेगाव पूर्व बिंबिसार नगरमधील 17, मालवणी मालाडमधील 29 आणि चारकोपमधील 12 दुकानांचा समावेश आहे. दुकानांच्या ई-लिलावात भाग घेण्यासाठी https://eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी, अर्ज, कागदपत्रे अपलोड करणे आणि अनामत रक्कम ऑनलाइन भरण्यासाठी 27 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजल्यापासून 21 डिसेंबरला रात्री 11.59 वाजेपर्यंत मुदत आहे. ई-लिलाव 23 डिसेंबरला याच संकेतस्थळावर होणार आहे.

दुकानांच्या किमतीत घट 

यापूर्वी म्हाडाच्या दुकानाची बेस प्राईज व्यावसायिक रेडिरेकनरच्या शंभर टक्के किंवा निवासी रेडिरेकनरच्या दोनशे टक्के यापैकी जे जास्त असेल त्यानुसार ठरवली जायची. प्राधिकरणाच्या नव्या ठरावानुसार आता व्यावसायिक रेडिरेकनरनुसार दुकानांची बेस प्राईज ठरवल्यामुळे दुकानांच्या किमती कमी झाल्या आहेत.

तर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर विक्री

जुलैला म्हाडाने 149 दुकानांचा लिलाव केला होता. त्यातील शिल्लक राहिलेल्या दुकानांचादेखील यंदाच्या लिलावात समावेश आहे. दोन वेळा लिलाव करूनही विक्री न झाल्यास ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर दुकानांची विक्री केली जाणार आहे.