
आमदारकीचे 21 तारखेला मतदान होते. 18 तारखेला लक्ष्मी दारोदार फिरली. 1 तारखेला रात्री बाहेरच खाटी टापून झोपा, लक्ष्मी येणार आहे, असे वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केले. आता तर नगरविकास खाते आपल्याकडे आहे. नगरविकास खाते में माल है, दुसऱ्या ची पोरं आपली समजू नयेत, असा ठोलाही त्यांनी अजितदादांना लगावला.
सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून प्रचारादरम्यान मत द्या, विकासासाठी निधी देतो असा सर्रास प्रचार नगरपालिका निवडणुकीत करण्यात येत आहेत. मत दिले नाही तर विकासासाठी निधी मिळणार नाही अशी दमदाटी करण्यात येत आहे. त्यातच नाशिकमधील सभेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभा निवडणुकीआधी लक्ष्मी आली. ऊठ भक्ता, काय झोपलाय? मी आलीये तुला प्रसन्न करायला. आताही तुम्हाला लक्ष्मी मिळेल. तुम्ही घराबाहेर झोपा, असे धक्कादायक विधान केले.
मटण त्यांचे खा, बटण आपले दाबा
पहिल्या बायका नवऱ्या कडे पैसे मागायच्या. आता नवरा बायकोकडे पैसे मागतो. ही निवडणूक शहर विकासाची आहे. अर्ध्या रात्री रक्त देणारी माणसं तुमच्यासमोर उभी केली आहेत. आता मटण देतील. मटण त्यांचे खा, बटण आपले दाबा, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
निवडणुकीत असे बोलावे लागते – बावनकुळे
निवडणुकीमध्ये असे बोलावे लागते. मात्र, निधी किती द्यायचा आहे हे आमचे तिन्ही प्रमुख नेते मिळून ठरवतात, अशी सारवासारव महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निधी देण्याच्या मुद्दय़ावरून केली.


























































