
हिंदुस्थानी क्रिकेट महत्त्वाचे आहे, मी नाही. मी या पदासाठी योग्य आहे की नाही, हे बीसीसीआयने ठरवावे. संघहित सर्वोच्च असल्याचे अधोरेखित करताना बीसीसीआयला बदल हवा असेल तर तो निर्णय मान्य करण्यास आपण तयार असल्याचे सांगत हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आपल्यावर झालेल्या प्रश्नांच्या भडिमाराला रोखण्याचा प्रयत्न केला.
या पराभवानंतर पत्रकार परिषदेत गंभीर यांना त्यांच्या भवितव्याबाबत, संघाच्या खालावलेल्या दर्जाबाबत आणि संघनिवडीच्या धोरणावर कठोर प्रश्नांना सामोरे जावे लागले. त्यांनी आपल्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार बीसीसीआयला असल्याचे स्पष्ट केले. मात्र पराभवाला लपवण्यासाठी त्यांनी आपल्या कामगिरीचा उल्लेख करताना इंग्लंडमधील चांगले निकाल, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कपसारख्या स्पर्धांतील यशाची आठवण करून दिली, मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या जबाबदारीपासून पळ काढणार नसल्याचेही त्यांनी ठामपणे मांडले. त्यांनी या पराभवाचे खापर कुणा एकावर न फोडता ही हार संपूर्ण संघाची आहे आणि त्याची जबाबदारी सर्वांत आधी माझीच आहे, असेही स्पष्ट केले.
95 धावांवर एक विकेट असताना 122 धावांत सात विकेट गमावल्याचा उल्लेख करत त्यांनी ही केवळ तांत्रिक चूक नसून मानसिक दुर्बलता असल्याचेही सांगितले. कोणत्याही एकाच खेळाडूला दोष देणे आपले धोरण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गंभीर यांच्या कार्यकाळात हिंदुस्थानने 18 कसोटींपैकी 10 सामने गमावले असून हाच मुद्दा त्यांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे.
























































