
तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद हिंदुस्थानला लाभले आहे. पण यंदा तो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचा शतक महोत्सवी सोहळा साजरा करणार आहे. स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे बुधवारी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा सर्वसाधारण सभेत एकमताने राष्ट्रकुल स्पर्धेच्या शताब्दी वर्षासाठी अहमदाबादला अधिकृतपणे मंजुरी दिल्याची गोड बातमी कळाली. याआधी 2010 मध्ये राजधानी नवी दिल्लीत या स्पर्धेचे पहिल्यांदा आयोजन करण्यात आले होते.
2030 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या यजमान पदासाठी अहमदाबादची शिफारस ऑक्टोबरमध्येच करण्यात आली होती. या स्पर्धेत 15 ते 17 क्रीडा प्रकारांचा समावेश असेल. यात अॅथलेटिक्स आणि पॅरा अॅथलेटिक्स, जलतरण आणि पॅरा जलतरण, टेबल टेनिस आणि पॅरा टेबल टेनिस, बोवल्स आणि पॅरा बोवल्स, वेटलिफ्टिंग आणि पॅरा पॉवरलिफ्टिंग, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स, नेटबॉल आणि बॉक्सिंग या खेळांचा समावेश निश्चित झाला आहे. उर्वरित स्पर्धांचे वेळापत्रक अंतिम करण्याची प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू होईल, तर पूर्ण यादी पुढील वर्षी जाहीर केली जाईल. 2030 मधील स्पर्धेच्या यजमानपदासाठी अहमदाबाद आणि नायजेरियातील अबुजा या शहरांनी बोली लावली होती, मात्र यात अखेरीस अहमदाबादची निवड निश्चित झाली.
या क्रीडा प्रकारांवर विचार सुरू
अद्याप विचाराधीन क्रीडा प्रकारांमध्ये तिरंदाजी, बॅडमिंटन, 3 बाय 3 बास्केटबॉल आणि व्हीलचेअर बास्केटबॉल, बीच व्हॉलीबॉल, टी-20 क्रिकेट, सायकलिंग, डायव्हिंग, हॉकी, जुडो, रिदमिक जिम्नॅस्टिक्स, रग्बी सेव्हन्स, शूटिंग, स्क्वॉश, ट्रायथलॉन आणि पॅरा ट्रायथलॉन तसेच कुस्ती यांचा समावेश आहे. यजमानांना दोन नवे किंवा पारंपरिक क्रीडा प्रकार सुचवण्याची मुभाही असेल. टी-20 क्रिकेटचा समावेश 2022 मध्ये बार्मिंगहॅममध्ये झालेल्या मागील स्पर्धेत झाला होता, मात्र तेव्हा फक्त महिलांच्या स्पर्धा खेळवण्यात आल्या होत्या.
2030 स्पर्धेचे ऐतिहासिक महत्त्व
2030ची आवृत्ती हॅमिल्टन (कॅनडा) येथे 1930 मध्ये झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतरची शताब्दी स्पर्धा असेल. 2010 मध्ये हिंदुस्थानात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत हिंदुस्थानने 38 सुवर्णांसह एकूण 101 पदके जिंकत पदकतालिकेत दुसरे स्थान मिळवले होते. त्यानंतर हिंदुस्थानला आतापर्यंत पदकांचे शतक ठोकता आलेले नाही. हिंदुस्थानी खेळाडूंचे या स्पर्धेतील दुसरे सर्वोत्तम प्रदर्शन 2002 च्या मँचेस्टर स्पर्धेत 69 पदकांसह (30 सुवर्ण) झाले होते.
पुढील स्पर्धांचे वेळापत्रक
1930 पासून आयोजित होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची 24 वी आवृत्ती 2030 मध्ये पार पडेल. मागील स्पर्धा 2022 मध्ये बर्मिंगहॅम (इंग्लंड) येथे झाली होती, तर पुढील 2026 ची स्पर्धा ग्लासगो (स्कॉटलंड) येथे होणार आहे. बर्मिंगहॅम 2022 मध्ये हिंदुस्थानी खेळाडूंनी 22 सुवर्णांसह एकूण 61 पदके जिंकली होती.
























































