
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथे उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. येथे लहान मोठे अनेक अपघात झाले असताना कामगार आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे पुलाखालून प्रवास करणारे प्रवासी आणि पुलावर काम करणारे कामगार दोघेही असुरक्षित आहेत.
बहादूरशेख नाक्यापासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत उड्डाण पुल उभारण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी बहादूरशेख नाका येथे गर्डर कोसळले होते. त्यानंतर पुलाचे नवीन डिझाईन करून चाळीस मीटरऎवजी वीस मीटरवर नवीन पीलर टाकण्याचे ठरले. पूर्वी उभारलेल्या पीलरच्या वरचा भाग तोडत असताना कामगार पडून जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर लोखंडी रॉड खाली पडून पादचारी जखमी झाल्याची घटना घडली होती. अशा अनेक घटना घडून सुद्धा संबंधित ठेकेदार तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण शासनाच्या कामगार कल्याण विभागाच्या कायद्यांना पायदळी तुडवत असल्याचे दिसते.
उड्डाण पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी कधी लोखंडी सळी कोसळते. कधी पत्रा कोसळतो तर कधी अन्य साहित्य वरून खाली पडते. सुदैवाने त्यात गंभीर जखमी होण्याचे प्रकार अलिकडे झालेले नाही. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून २४ तास वाहतूक सुरू असते. त्यामुळे सेवा रस्त्यावर अपघात होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. डीबीजे महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच या भागातील प्रवासी येथून पायी चालत ये – जा करीत असतात. अनेकवेळा रस्त्याच्या बाजूला रिक्षा उभ्या केल्या जातात. महामार्गाच्या दोन्ही बाजूने काही हॉटेल आणि पेट्रोल पंप आहेत. येथे येणाऱ्या वाहन चालकांना तसेच पर्यटकाची सुरक्षाही धोक्यात आहे.
उड्डाण पुलाच्या कामावर सुमारे साठ कामगार कार्यरत आहेत. त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, हातमोजे, सेफ्टी शु देणे गरजेचे आहे. त्याकडे कंपनीने दुर्लक्ष केले आहे. पुलाच्या खांबाचे काम करत असताना कामगार असुरक्षितपणे पळीवर किंवा लोखंडी गजावर उभे राहुन आपला जीव धोक्यात घालून काम करताना दिसतात. त्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. कामगार ज्या ठिकाणी काम करणार आहे त्याठिकाणी सुरक्षिततेसाठी जाळ्या बांधणे गरजेचे आहे. त्या मोजक्या ठिकाणी बांधलेल्या आहेत. संबंधित मजुर हे परप्रांतीय असल्याने त्यांच्याकडून याबाबत कोणताही आवाज उठविला जात नाही.
उड्डाण पुलाच्या ठिकाणी काम करणारे कामगार खासगी एजन्सीचे आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्या पाहिजेत. अशा सूचना आम्ही एजन्सीला दिल्या आहेत. त्यांचा वीमा उत्तरवण्याची सूचनाही केली आहे. उड्डाण पुलाचे काम करताना कोणताही अपघात होणार नाही याची खबरदारी आम्ही घेत आहेत. अनेकवेळा रात्री कामाला प्राधान्य देतो कारण रात्री वाहतूक कमी असते. अपघात होणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत. – नजीब मुल्ला, सहाय्यक अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग चिपळूण























































