ठाकुर्ली उड्डाणपुलावरून भाजप-शिंदे गटात श्रेयवादाची लढाई; केडीएमसी निवडणुकीच्या तोंडावर बॅनरबाजी

केडीएमसी निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिंदे गटात श्रेयवादातून लढाई सुरू झाला आहे. ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या निधी मंजुरीवरून दोन्ही गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. ‘विकासाचा खरा योद्धा कोण?’ असे बॅनर शिंदे गटाने डोंबिवलीत लावल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने कल्याण-डोंबिवलीच्या विकासाचे ‘स्पीडब्रेकर’ कोण? या आशयाचे बॅनर उभारून शिंदे गटाला डिवचले आहे.

शिंदे गटाने भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांना लक्ष्य करत ‘आमचे काम बोलते, फोडाफोडीच्या राजकारणाला छेद देत विकासासाठी कटिबद्ध’ असे संदेश असलेले फलक ठाकुर्ली परिसरात झळकवले. यावर भाजपच्या माजी नगरसेविका रेखा चौधरी, प्रमिला चौधरी, खुशबू चौधरी आणि साई शेलार यांनी शिंदे गटाचा विकास खोटा असल्याचे फलक उभारले आहेत. जनतेला उत्तर द्या… तुमच्या विकासाच्या योद्ध्याने २०१४ पासून आजपर्यंत उन्नत मार्ग का पूर्ण केला नाही? असे म्हणत खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली आहे. कल्याण-डोंबिवलीच्या विकासाचे ‘स्पीडब्रेकर’ कोण? असे मजकूर असलेले बॅनर लावून श्रीकांत शिंदे यांचा बुरखा फाडला आहे.

निधी रोखणारे हेच का योद्धे ?
शहर विकासाचे ३७२ कोटी रोखून कोणी धरले होते? जनतेला विकासाचा खरा योद्धा आणि अडथळा कोण हे चांगलेच माहीत आहे. आधी माहिती घ्या, मग लोकांसमोर बड्या बाता मारा अशी बोचरी टीका भाजपने शिंदे गटावर केली आहे.