
पालिका निवडणुकीसाठी ठाणे पालिकेने प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या खऱ्या. मात्र या मतदार याद्यांमध्ये गंभीर चुका असल्याचे वारंवार समोर आल्या आहेत. त्यामुळे प्रारूप मतदार याद्यांची छाननी करण्यासाठी किमान १५ दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ तत्काळ जाहीर करावी अशी मागणी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.
एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात, मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता नसल्याच्या गंभीर चुका समोर आल्या आहेत. याची दखल घेवून कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख अॅड. रोहिदास मुंडे, दिवा शहरप्रमुख सचिन पाटील, विभागप्रमुख चेतन पाटील यांनी मतदार याद्यांचा छाननी कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे.
- वॉर्ड क्रमांक २८ च्या याद्यांमध्येही विसंगती समोर आली आहे. वॉर्ड क्रमांक २७ मधील यादी क्रमांक ४६ ही वॉर्ड क्रमांक २८ मध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
- दिव्यातील २७ व २९ वॉर्डमधील याद्या उपलब्ध करून देण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरली आहे. त्यामुळे प्रशासनाचा हलगर्जी कारभार समोर आला आहे.


























































