
शहरातील पहेलवान टी हाऊसजवळ गुरुवारी सायंकाळी अनुसूचित जातीच्या तरुणाची हत्या ही ऑनर किलींग असून याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. सक्षम गौतम ताटे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गजानन बालाजी मामीडवार, हेमश मामीडवार, साहिल मामीडवार, सोमेश सुभाष लके अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर वेदांत अशोक कुंडेवकर असे फरार आरोपीचे नाव आहे. मामीडवार कुटुंबियांवर याआधीही अनेक गुन्हे दाखल आहेत.
मिलिंदनगर भागातील पहेलवान टी हाऊसजवळ सक्षमला काही तरुणांनी घेरले आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हल्ल्यानंतर सक्षम खाली कोसळताच आरोपींनी त्याच्या डोक्यात फरशीने वार करून डोक्याचा चेंदामेंदा केला. याप्रकरणी आरोपींविरोधात कट रचून हत्या करणे, अॅट्रॉसिटी कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सक्षम ताटेचे मामीडवार कुटुंबातील मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ते दोघे पळून जाऊन लग्न करणार होते. मामीडवार कुटुंबियांना याची कुणकुण लागल्यानंतर त्यांनी सक्षमचा कायमचा काटा काढला.




























































