सामना अग्रलेख – रवींद्र चव्हाणांची सुपारी, नक्की काय होणार?

जोपर्यंत वर मोदी-शहा असे दोघे बसले आहेत, तोपर्यंत आमचा कोणी बालही वाकडा करणार नाही हा मिंधे गटाचा भ्रम आहे. मोदी-शहा व त्यांचा भाजप कोणाचाच नाही. हिंदुहृदयसम्राटांनी मोदी-शहांना प्रचंड मदत केली. ते हिंदुहृदयसम्राटांचे होऊ शकले नाहीत तेथे मिंधे कोण? कोकणात मिंध्यांचे आमदार नीलेश राणेंवर गुन्हा दाखल झाला. अनेक ठिकाणी भाजपचे लोक मिंध्यांच्या लोकांना बडवत आहेत. मिंधे हतबलपणे फक्त, ‘‘हे बरे नाही. युतीचा धर्म पाळा’’ इतकेच बोलत आहेत. दोन नंबरला खरेच काहीच किंमत नसते. त्यांचे बडबडणे आणि ऊर बडवणे याला उकिरड्यावरचे कुत्रे विचारत नाही. नगरपालिका निवडणुकांनंतर महाराष्ट्रात बरेच काही घडेल. रवींद्र चव्हाणांनी सुपारी कातरायला घेतलीच आहे.

‘महायुती’ नावाची तीन पायांची राजकीय व्यवस्था सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तीन पक्ष सत्तेत सहभागी होते. त्या वेळी भाजपवाले ‘तीन चाकी रिक्षा’ अशी टीका सरकारवर करत होते. आता त्यांच्या नशिबीदेखील तीन चाकी रिक्षाचे सरकार आले आहे. ही रिक्षा सध्या भरकटली आहे व कधीही खड्ड्यात पडेल अशी स्थिती आहे. राज्यातील नगरपालिका निवडणुकीतील चढाओढींमुळे रिक्षातच हाणामाऱ्या व कुरघोड्या सुरू झाल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे रोज उठून रिक्षात बसलेल्या दाढीवाल्याची दाढी ओढून त्यांचा तमाशा करतात, पण सत्तेची लाचारी व ईडीसारख्या यंत्रणांचे भय यामुळे स्वतःस शिवसेना म्हणवून घेणारे भाजपचा बुटचाटेपणा करीत आहेत. रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केले, ‘‘दोन नंबर वगैरे सगळे झूठ आहे. दोन नंबरला काहीच किंमत नसते. देवाभाऊच सब कुछ!’’ यावर दोन नंबरवाले दोघे गप्प आहेत. 2 डिसेंबरनंतर ‘युती’चा काय तो निकाल लागेल असेही भाजपचे प्रदेशाध्यक्ष सांगत आहेत व युतीची दोन ओझ्याची गाढवे गप्प आहेत. नगरपालिका निवडणुकांनंतर महाराष्ट्रात बरेच काही घडेल. शिंदे व त्यांच्या लोकांची फडणवीस-चव्हाणांनी पुरती काेंडी करून ठेवली आहे. राज्यातील नगरपालिका निवडणुकांत सत्तेचा आणि पैशांचा खेळ सुरू आहे तो फडणवीस व मिंधे गटात. ही निवडणूक युतीतल्या दोन पक्षांतच लढली जात आहे. महाराष्ट्रात असंख्य प्रश्न असताना मुख्यमंत्री व त्यांचे दोन ‘उप’ नगरपालिका निवडणुकांसाठी रान उठवीत आहेत. नगरपालिका निवडणुकांमध्ये पाच-सहा हेलिकॉप्टर्स, खासगी विमानांचा वापर प्रचारासाठी होणे हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत आहे. कारण

भाजप व मिंधे गटातली

ही स्पर्धा आहे. ‘‘भाजपने युती धर्माचे पालन केले पाहिजे. तो न पाळल्यास संघर्ष होईल,’’ असे श्रीमान मिंधे सांगतात, पण भाजपबरोबर संघर्ष करण्याइतके नैतिक बळ मिंधे वगैरे लोकांकडे आहे काय? मिंधे हे अमित शहांचे राजकीय आश्रित आहेत व आश्रितांकडे स्वाभिमान, संघर्ष वगैरे गोष्टी बिनकामाच्या ठरतात. आश्रितांनी फेकलेल्या तुकड्यांवर जगायचे असते. फडणवीस प्रचार सभांतून सांगतात, ‘‘आमच्याकडे नीती, नियती आणि निधीही भरपूर आहे.’’ राज्याचे मुख्यमंत्री या स्तरावर जाऊन प्रचार करतात तेव्हा पंचायत, नगरपालिका निवडणुकांचे महत्त्व हे फक्त पैशांपुरते राहते. सत्तेचे विकेंद्रीकरण हा या निवडणुकांचा मूळ गाभा नष्ट होतो. मताला 10 ते 15 हजार भाव ठरवून भाजप व मिंधे गट एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. मतदार अशा पैशांना चटावले आहेत व जो पैसा देईल त्याचा दुपट्टा गळ्यात अडकवून ते ‘झिंदाबाद’ला तयार आहेत. त्यांना ना नीती ना नियती. फक्त पैसा आणि पैशांचाच खेळ. मिंधे गटाच्या ‘गुलाबो’ गँगचा पुढारी म्हणतोय, ‘‘आमच्याकडे नगरविकास खाते असल्याने पैसाच पैसा आहे. मतदारांना 1 तारखेला सकाळपासून लक्ष्मीदर्शन होईल.’’ अशा लक्ष्मीदर्शनात गुंतलेल्या नगरपालिका निवडणुकांतून शेवटी जनतेला पाच-दहा हजारांशिवाय हाती काहीच लागणार नाही. या पाच-दहा हजारांत मतदार आपले भविष्य, महाराष्ट्राची इभ्रत विकत आहेत हे चित्र काही बरे नाही. ‘दोन नंबरला किंमत नाही, एक नंबरवालाच खरा’ हे त्रिवार सत्य असताना दोन नंबरवाले जाहीर सभांतून फोनवर मंत्र्यांना फोन करून एमआयडीसी, इस्पितळे, रस्ते वगैरे देण्याची गॅरंटी देतात, पण दोन नंबरवाल्यांनी जाहीर सभांतून कितीही ‘हमी’ दिली तरी कर्तेसवरते मुख्यमंत्रीच असतात व त्यांनी

दोन्ही दोन नंबरवाल्यांची

संपूर्ण नाकाबंदी केल्याचे स्पष्ट दिसते. सध्याचा दोन नंबरी हा खरे तर दस नंबरी आहे. शिवसेनेने त्याला एक नंबरी केले. त्याच एक नंबरीने पाठीत खंजीर खुपसून भाजपचे दोन नंबरी म्हणून काम स्वीकारले. आता या दोन नंबरीचे खरे नाही हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बोलत असतील तर त्यावर विश्वास ठेवायला हवा. देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिल्याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कोणतेही आडवे तिडवे वक्तव्य करणार नाहीत. मिंधे गटाचे शहाजी पाटील यांनीही अलीकडेच स्पष्ट केले की, ‘‘आमच्या नशिबी भाजपची गुलामीच आली आहे.’’ हे खरेच आहे. कर्माची फळे ते भोगत आहेत. पुढील काळात मिंधे गट हा अजगराच्या विळख्यात जाईल व किमान 35 आमदार गिळून भाजप ढेकर देईल. रवींद्र चव्हाण यांच्या म्हणण्यातला गर्भित अर्थ तोच आहे. मिंधे गटाचे निर्माते भाजपवालेच आहेत. जोपर्यंत वर मोदी-शहा असे दोघे बसले आहेत, तोपर्यंत आमचा कोणी बालही वाकडा करणार नाही हा मिंधे गटाचा भ्रम आहे. मोदी-शहा व त्यांचा भाजप कोणाचाच नाही. हिंदुहृदयसम्राटांनी मोदी-शहांना प्रचंड मदत केली. ते हिंदुहृदयसम्राटांचे होऊ शकले नाहीत तेथे मिंधे कोण? कोकणात मिंध्यांचे आमदार नीलेश राणेंवर गुन्हा दाखल झाला. अनेक ठिकाणी भाजपचे लोक मिंध्यांच्या लोकांना बडवत आहेत. मिंधे हतबलपणे फक्त, ‘‘हे बरे नाही. युतीचा धर्म पाळा’’ इतकेच बोलत आहेत. दोन नंबरला खरेच काहीच किंमत नसते. त्यांचे बडबडणे आणि ऊर बडवणे याला उकिरड्यावरचे कुत्रे विचारत नाही. नगरपालिका निवडणुकांनंतर महाराष्ट्रात बरेच काही घडेल. रवींद्र चव्हाणांनी सुपारी कातरायला घेतलीच आहे.