नवी मुंबईत एकाच छताखाली पाच हजार घरे; 12 डिसेंबरपासून प्रॉपर्टी एक्झिबिशन

वाशी येथील सिडको सेंटरमध्ये येत्या १२ ते १५ डिसेंबरदरम्यान बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबईच्या वतीने २४ व्या प्रॉपर्टी एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले आहे. एमएमआरडीए क्षेत्रातील नागरिकांचे विशेष आकर्षण असलेल्या या एक्झिबिशनमध्ये यंदा मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, खालापूर, खोपोली येथील सुमारे पाच हजार घरे आणि एमआयडीसीत उभ्या राहणाऱ्या बिझनेस संकुलातील व्यावसायिक गाळे नागरिकांना एकाच छताखाली पाहायला मिळणार आहेत.

यंदाच्या प्रॉपर्टी एक्झिबिशनसाठी बिल्डर्स असोसिएशनने नवी मुंबई रन वे फॉर फ्युचर ही संकल्पना ठेवली आहे. प्रदर्शनात एकाच छताखाली ५०० बांधकाम प्रकल्पांमधील घरे आणि व्यावसायिक गाळे ग्राहकांना पाहता येणार आहेत. मुंबई आणि एमएमआरडीए क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकही या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.

नवी मुंबईसह अन्य शहरात धोकादायक इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे. या प्रकल्पातील हजारो घरे या प्रदर्शनात इच्छुकांना पाहता येणार आहेत, असे बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबईचे अध्यक्ष रसिक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी माजी अध्यक्ष देवांग त्रिवेदी, मनीष भतिजा, वसंत भद्रा, चिराग शहा, हितेश गामी, महेश पटेल, झुबेन संघोई, जिगर त्रिवेदी आदी उपस्थित होते.