
शेलूच्या मोहिली परिसरात भरदुपारी बिबट्याने भटक्या कुत्र्याचा फडशा पाडला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच दहशतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने बिबट्याचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही या बिबट्याचा ठावठिकाणा न लागल्याने ही मोहीम थांबवण्यात आली.
शनिवारी दुपारी मोहिली गावात बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला केला. त्यानंतर त्याने कुत्र्याला जंगलात फरफटत नेले. ही संपूर्ण घटना रस्त्याने चालत जाणाऱ्या सिद्धी घागस या शाळेतील विद्यार्थिनीने पाहिला. तिने ही बाब गावात सांगितली असता एकच खळबळ उडाली. वनविभागाला पाचारण करण्यात आले. वनविभागाने या बिबट्याचा शोध घेतला असता पायांचे ठसे सापडले. मात्र बिबट्या सापडला नाही. अखेर बिबट्याला पुन्हा जंगलात पाठवण्यासाठी पथकाने गावाच्या वेशीवर फटाक्यांची आतषबाजी केली.
गेल्या महिनाभरापासून बिबट्याचा वावर असल्याच्या अनेक तक्रारी वनविभागाकडे दाखल करण्यात येत होत्या. मात्र प्रत्यक्ष हा बिबट्या दिसत नसल्याने संभ्रम निर्माण झाला होता. त्यातच शेलू रेल्वे स्टेशनवर बिबट्या फिरत असल्याचा एआय व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असा इशारा दिला आहे. तसेच ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.



























































