
प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते की, आपले मूल उच्च शिक्षण घेऊन मोठे व्हावे, कुटुंबाचा आधार बनावे आणि समाजासाठी आदर्श ठरावे. अशीच प्रेरणादायी कथा आहे संगमेश्वर तालुक्यातील तुरळ हरेकरवाडी येथील भावेश पाले यांची. गावातील पहिला चार्टर्ड अकाउंटंट (CA) बनण्याचा मान मिळवणाऱ्या हा तरुणाचे आयुष्य म्हणजे संघर्ष, स्वप्न, कष्ट आणि जिद्दीची विलक्षण सांगड आहे.
अत्यंत गरीब घरातील परिस्थिती, पण मोठी स्वप्ने
भावेशच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय होती. स्वतःची जमीन केवळ दोन हाताची, गावात कुठल्याही प्रकारचे उत्पन्नाचे साधन नाही, शासकीय किंवा साधी खाजगी नोकरी नाही. दिवसभर काम केले तरच चुल पेटण्याची वेळ. आई दिपाली आणि वडील दीपक पाले यांचे शिक्षण कमी; कुटुंबात पाच सदस्य. बहीण भाविका अभ्यासात हुशार, परंतु परिस्थितीमुळे तीही आपल्यापरीने कुटुंबासाठी हातभार लावत असे. गावात उत्पन्नाचे कोणतेही स्थिर साधन न मिळाल्याने पाले कुटुंब थेट मुंबईत दाखल झाले. राहायचे कोठे? हा मोठा प्रश्न; अखेर घाटकोपरमधील एका पत्र्याच्या झोपडीत, गोडाऊनसदृश खोलीत त्यांनी संसार थाटला. आईला चपाती लाटण्याचे काम, वडिलांना गरजेनुसार हॉटेलमध्ये वेटरचे काम, नंतर मंडप बांधणीचे काम असे कामधंदे करत ते संसार चालवत राहिले. सुट्टीच्या दिवशी वडील हातगाडी ओढून कुटुंबाचा गाडा ओढत.
भावेश लहानपणापासूनच अभ्यासू होता. आई ज्या घरात काम करत होती, त्या मालकांनी पहिलीच्या फीची मदत केली. पुढे भावेशने विश्वासास पात्र ठरवत एक-एक इयत्ता उत्तीर्ण करत दहावीत ८०% गुण मिळवले. मामा दत्ताराम धनावडे आणि काहींनी पुढाकार घेत त्याला अकरावी-बारावीचे शिक्षण सोमय्या कॉलेजमध्ये करून दिले. बारावीला त्याने ७९% गुण प्राप्त केले. कॉमर्स पूर्ण केल्यानंतर भावेशने सीएचा अतिशय कठीण अभ्यासक्रम हाती घेतला.
घरासमोर सतत वाहतुकीचा गोंगाट, आजूबाजूला कायम दंगा, आवाजाची दाहकता, अभ्यासाचा अभाव असलेली जागा हे सगळं असूनही भावेश यशासाठी झटत राहिला. अशावेळी रात्री दोन वाजता शांतता पसरल्यावर भावेश अभ्यासाला बसायचा. रात्रभर अभ्यास आणि दिवसभर काम, असा त्याचा दिनक्रम वर्षानुवर्षे सुरू राहिला. पहिल्याच प्रयत्नात सीएची पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली. पुढील चार वर्षे चिकाटीने, अपार मेहनतीने अभ्यास करत अखेर भावेशने सीए (चार्टर्ड अकाउंटंट) ही कठीण समजली जाणारी परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली.
भावेश पाले हा हरेकरवाडी गावातील पहिला चार्टर्ड अकाउंटंट ठरला आहे. त्याच्या या यशामागे आई-वडिलांचे अथक कष्ट, त्याग, मामांचा आणि पोलीस पाटील संजय ओकटे यांचा पाठिंबा अमूल्य ठरला. गरिबी, संघर्ष आणि प्रतिकूल परिस्थिती यांचा सामना करत उभा राहिलेला भावेश आज हजारो गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श बनला आहे. परिस्थिती काहीही आणि कशीही असली तरी स्वप्न मोठं असलं की यश नक्कीच मिळतं, हेच याचे मुर्तीमंद उदाहरण आहे.





























































