
हिंदुस्थानच्या फुटबॉल संघाने अहमदाबादमध्ये इतिहास घडविला. 17 वर्षांखालील आशियाई पात्रता फुटबॉल स्पर्धेच्या गटफेरीतील ‘जिंका किंवा मरा’च्या लढतीत बलाढय़ इराणवर 2-1 गोल फरकाने पराभव करीत हिंदुस्थानने आगामी वर्षी सौदी अरेबियात होणाऱया 17 वर्षांखालील आशियाई चषक स्पर्धेचे तिकीट मिळविले. हिंदुस्थानच्या या कुमार संघाने तब्बल 66 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर (1959 सालानंतर) इराणला हरविण्याचा पराक्रम करीत ऐतिहासिक विजय मिळविला, हे विशेष.
इराण सात गुणांसह फेव्हरेट म्हणून मैदानात उतरला होता आणि त्यांना पुढील फेरीत जाण्यासाठी केवळ बरोबरीची गरज होती. हिंदुस्थानकडे चार गुण असल्याने विजय हाच एकमेव पर्याय होता. कारण गटफेरीत विजेता संघच आगेकूच करणार होता. निर्णायक सामन्यात हिंदुस्थानी संघाने जिद्द, मेहनत आणि शिस्तबद्ध खेळाच्या जोरावर विजयाचे अवघड लक्ष्य पूर्ण केले. ‘ड’ गटात इराण व हिंदुस्थानचे 7-7 असे समान गुण झाले. मात्र ‘हेड-टू-हेड’मध्ये इराणला मागे टाकत हिंदुस्थानी संघाने एएफसी 17 वर्षांखालील आशियाई कपमध्ये आपले स्थान निश्चित केले. या प्रतिष्ठsच्या स्पर्धेसाठी हिंदुस्थानने सलग चौथ्यांदा, तर एकूण दहाव्यांदा पात्रता मिळविली. यापूर्वी हिंदुस्थानने 1990, 1996, 2002, 2004, 2008, 2012, 2016, 2018 आणि 2023 या आवृत्त्यांमध्ये पात्रता मिळवली होती. यांपैकी 2002 आणि 2018 हे सर्वोत्तम प्रदर्शन ठरले, ज्यात हिंदुस्थानी संघाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंतचा प्रवास केला होता.
हिंदुस्थानचा थरारक विजय
सुरुवातीपासून दबाव टाकणाऱया इराणने 18व्या मिनिटाला गोल करून आघाडी घेतली होती. मात्र हिंदुस्थानी गोलरक्षक राजरूप सरकारने अनेक निर्णायक बचाव करत संघाला सामन्यात ठेवले. कर्णधार डल्लालमुओन गांगतेने पहिल्या हाफच्या अतिरिक्त वेळेत (45औ1 मिनिटे) पेनल्टीवर गोल करत हिंदुस्थानला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर 51व्या मिनिटाला हिंदुस्थानने निर्णायक गोल नोंदवत 2-1 अशी आघाडी घेतली. उरलेल्या कालावधीत हिंदुस्थानच्या बचाव फळीने मैदानावर जिवाचे रान करीत ही आघाडी टिकवली. दुसरीकडे इराणने किमान बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र अखेरचा शिट्टीचा आवाज मैदानात घुमताच हिंदुस्थानी खेळाडूंचा आनंद उफाळून आला. बेंचवरून धावत येणारे सहकारी, एकमेकांना मिठय़ा मारत रडणारे खेळाडू, मुठी आवळून आकाशाकडे पाहणारे चेहरे या दुर्मिळ क्षणाची फुटबॉलप्रेमींनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभूती घेतली.

























































