
“आळंदीत बाकीचे लोक येतील, काही सांगतील. परंतु त्यांचे जिल्हे वेगळे आहेत. ते त्यांच्या जिल्ह्याचा विचार करतील. माझ्याकडे फाईल आली की मी पुणे जिल्ह्याचा प्राधान्याने विचार करतो. मी पुण्याचा पालकमंत्री असून जिल्ह्याचा सुपुत्र आहे. जे काही बरे वाईट व्हायचे ते तुमचे माझे या जिल्ह्यातच होणार,” असे विधान करत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसह मिंध्यांवर कुरघोडी केल्याची चर्चा रंगू लागली आहे.
आळंदी नगरपरिषदेतील अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी त्यांची जाहीर सभा झाली. यावेळी पवार म्हणाले, “पहाटे साडेपाच वाजता बारामतीत स्वच्छता सुरू होते. तसेच आळंदीत झाले पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल. विकासकामांसाठीच्या प्रस्तावांना मान्यता व निधी दिला जाईल. केंद्र व राज्य शासनाचा निधी आणला जाईल.”
पुढे ते म्हणाले, “मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. मी पुणे जिल्ह्याचा सुपुत्र आहे. जे काही बरे वाईट व्हायचे ते आपल्या जिल्ह्यातच होईल. बाकीचे लोक येतील, सांगतील, पण त्यांचे जिल्हे वेगळे आहेत. त्यांच्या पुढे फाईल गेल्यावर ते आधी स्वतःच्या जिल्ह्याचा विचार करतील. माझ्याकडे फाईल आली की मी पहिले पुणे जिल्ह्याचा विचार करेन. मी कामाचा माणूस आहे; खोटे बोलत नाही.”
लाडक्या बहिणींवर उन्हाची झळ
सभेला मोठी गर्दी होती. यावेळी पवार म्हणाले, “उन्हाची तीव्रता जास्त आहे. लाडक्या बहिणींना उन्हात बसावे लागत आहे. पुरुषांनाही उन्हात थांबावे लागत आहे. मीही ऊन सहन करत आहे. तुम्हीही सहन करा.” मात्र महिलांना उन्हात बसावे लागल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.



























































