
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी नवी मुंबई महापालिकेत कल्याण लोकसभेतील १४ गावे नव्याने समाविष्ट केली. कल्याण तालुक्यातील ही १४ गावे बाहेर काढावीत यासाठी वनमंत्री गणेश नाईक आक्रमक झाले असतानाच नवी मुंबई पालिका प्रशासनाने मात्र या गावांवर खर्च करण्यासाठी सहा कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावामुळेच नाईकांचा विरोध डावलून पालिका हा खर्च करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे नाईकविरुद्ध शिंदे असा संघर्ष अधिकच चिघळणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने १४ गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेत केला. ही १४ गावे शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदार संघात येतात. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही १४ गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्याच्या घेतलेल्या या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईक यांनी आता जोरदार विरोध सुरू केला आहे. नवी मुंबईतून या गावांमध्ये जाण्यासाठी दोन महापालिकांच्या हद्दीतून जावे लागते. त्यामुळे ही गावे ठाणे किंवा पनवेल महापालिकांना जोडण्यात यावीत अशी मागणी नाईक यांनी करून गावांमध्ये विकासकामे करण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने आपला निधी खर्च करू नये अशी भूमिका घेतली. महापालिका निवडणूक झाल्यानंतर ही गावे पुन्हा नवी मुंबई पालिकेतून काढण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले असतानाच या गावांमध्ये खर्च करण्याचा धडाका पालिका प्रशासनाने सुरू केला आहे.
- पहिल्या टप्प्यात गावांतील शाळांचा विकास हाती घेण्यात येणार आहे. या शाळा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चाल वल्या जात होत्या. त्यामुळे त्यांची अवस्था दयनीय आहे. शाळांची डागडुजी करण्यासाठी पालिका प्रशासनाने सुमारे सहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
- दहिसर ठाकूर पाडा, वाकलन, निघू, नारिवली या गावांमधील शाळांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य गावातील शाळांची डागडुजी हाती घेण्यात येणार आहे.
- शाळांच्या डागडुजीची कामे मार्गी लागल्यानंतर या परिसरातील अन्य विकासकामे करण्याचे नियोजनही महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने तयार केले आहे.
- १४ गावे कोणाच्या लहरीपणामुळे नवी मुंबई पालिकेत आली आहेत. त्यामुळे या गावांचा भार आमच्यावर विनाकारण लादू नये, अशी भूमिका नाईक यांनी घेतल्यानंतरही पालिकेने या गावांचा विकास सुरू केल्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.




























































