
छत्तीसगडच्या बिजापूर जिह्यात सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. त्यात 12 नक्षलवाद्यांचा खातमा करण्यात आला, तर नक्षलवाद्यांच्या गोळीबारात डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डचे तीन जवान शहीद झाले, तर दोघे जखमी झाले.
बिजापूरच्या जंगलात एका ठिकाणी माओवाद्यांचा तळ पडला असल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्या माहितीनुसार, डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड, स्पेशल टास्क फोर्स आणि सीआरपीएफच्या कोब्रा कमांडोंच्या पथकाने सकाळी 9 वाजता संयुक्त कारवाई केली. अनेक तास दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरू होता. संध्याकाळच्या सुमारास गोळीबार थांबल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम हाती घेतली, तेव्हा 12 नक्षलींचे मृतदेह हाती लागले. याशिवाय, मोठय़ा प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला.
या कारवाईत तीन जवानांना हौतात्म्य आले. त्यात मोनू वादादी, दुजारू गोंड आणि रमेश सोडी यांचा समावेश आहे. दोन जवानांना गोळ्या लागल्या आहेत. मात्र त्यांच्या जिवाचा धोका टळला आहे, अशी माहिती बिजापूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यादव यांनी दिली.
वर्षभरात 23 जवान शहीद
केंद्र सरकारने नक्षलवादाचा बिमोड करण्याचा निर्धार केला आहे. त्या अनुषंगाने सतत चकमकी झडत आहेत. या वर्षात झालेल्या चकमकाRमध्ये आतापर्यंत 23 जवानांना वीरमरण आले आहे. मागील वर्षी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 19 जवानांचा मृत्यू झाला होता.































































