
देशाला कोटय़वधी रुपयांचा चुना लावून परदेशात परागंदा झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्या याला मुंबई उच्च न्यायालयाने आज सुनावले. मल्ल्याने फरार आर्थिक गुन्हेगार कायद्याच्या अंमलबजावणीला आव्हान दिले आहे. मात्र त्याच्या अर्जावर तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर आधी हिंदुस्थानात या मग तुमचे म्हणणे मांडा, अशा शब्दांत न्यायालयाने मल्ल्याला सुनावले.
एफईओ कायद्याचे कलम 12 (8) घटनाबाह्य असल्याचा दावा करून मल्ल्या याने त्याला आव्हान दिले आहे. तसेच आरोपांतून निर्दोष सुटका झाल्यास जप्त केलेली मालमत्ता परत करण्याची कायद्यात कोणतीही तरतूद नाही, असे नमूद करून हे मनमानी असल्याचा दावाही मल्ल्या याने याचिकेत केला आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर आज गुरुवारी सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी खंडपीठाने याचिकेच्या वैधतेवर आक्षेप घेतला. मल्ल्यातर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी युक्तिवाद केला. त्यांनी मल्ल्या लंडनमध्ये असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यावर मुख्य न्यायमूर्तींनी मल्ल्याला उद्देशून तुम्ही आधी हिंदुस्थानात या, मग तुमचे म्हणणे मांडा, त्यानंतरच आम्ही तुमचे म्हणणे ऐपू, असे सुनावले. अर्जदार (मल्ल्या) कधी येणार हे वकिलांनी सांगितल्यानंतरच याचिकेवर सुनावणी घेण्यात येईल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले व सुनावणी 23 डिसेंबरपर्यंत तहपूब केली.
























































