
मुंबई विद्यापीठांतर्गत 28 नोव्हेंबर रोजी घेतलेल्या द्वितीय वर्ष मराठी विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत अनेक प्रश्न चक्क इंग्रजी भाषेत दिल्याचे समोर आले आहे. याबाबत शिवसेना नेते–युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे आलेल्या तक्रारींची दखल घेत युवा सेना सिनेट सदस्यांनी विद्यापीठाचे कुलसचिव प्रसाद कारंडे यांची भेट घेऊन या प्रकरणातील दोषींवर कारवाई करा आणि पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घ्या, अशी मागणी केली.
मुंबई विद्यापीठ द्वितीय वर्ष विधी अभ्यासक्रमाची परीक्षा 28 नोव्हेंबर रोजी पार पडली. यामध्ये अनेक महत्त्वाचे शब्ददेखील इंग्रजी भाषेत होते. याआधी झालेल्या परीक्षेतही असाच प्रकार घडल्याचे समोर आले होते. मराठीत परीक्षा असताना मोठय़ा प्रमाणात इंग्रजी शब्द वापरण्यात आले होते. याबाबत युवा सेनेकडून विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र विद्यापीठाकडून हा प्रकार पुन्हा सुरूच आहे. याची गंभीर दखल घेत युवा सेना सिनेट सदस्यांनी कुलसचिवांची भेट घेऊन निवेदन दिले. यापुढे मराठी भाषेत उत्तर लिहिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुद्ध मराठी भाषेत प्रश्नपत्रिका देण्यात यावी अशी आग्रही मागणी करून मराठी भाषेची गळचेपी कदापि सहन केली जाणार नाही, असे ठणकावले. या तक्रारीनंतर कुलसचिवांनी मराठी माध्यमाच्या सर्व प्रश्नपत्रिका शुद्ध मराठी भाषेतच काढण्यात याव्यात असे परिपत्रक काढण्याचे आदेश दिले. यावेळी उपनेत्या शीतल शेठ-देवरुखकर, सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर उपस्थित होते.



























































