
देशाच्या पंतप्रधान कार्यालयातच भ्रष्टाचार, जुगार, सट्टेबाजीला ऊत आला आहे. हाच पैसा भाजपच्या राजकारणात आणला जातो. ज्यांच्यावर ‘ईडी’, ‘सीबीआय’च्या कारवाया झाल्या असे उद्योगपती आणि कंपन्यांकडून हजारो कोटींच्या निवडणूक देणग्या घेणाऱ्या भाजपने लाज सोडली आहे. त्यामुळे सर्व सट्टेबाज माफियांना भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ केले जाईल व पंतप्रधान कार्यालयातील सट्टेबाजी व जुगार हा हिंदुत्वाचे प्रतीक म्हणून जाहीर केले जाईल. देशाची प्रतिष्ठा इतकी खालच्या पातळीवर कधीच घसरली नव्हती. पुन्हा या सर्व प्रकारावर मोदींचे मौन आहे. गृहमंत्री पडद्यामागे हालचाली करत आहेत. उद्या पंतप्रधान कार्यालयात ‘सट्टेबाजी’, मनी लाँडरिंग झाले हे विसरण्यासाठी एखादी धर्माची अफू गोळी दिली जाईल, दुसरे काय!
पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचार सहन करणार नाही, असे वारंवार सांगितले. ‘न खाऊंगा और खाने दूंगा’ ही त्यांची गर्जना होती. त्या गर्जनेचे मागच्या 11 वर्षांत काय झाले याचा अनुभव देश घेत आहे. एकजात सर्व भ्रष्टाचाऱ्यांना एकत्र घेऊन भाजप स्वतःचा विस्तार करीत आहे व पंतप्रधान मोदी या भ्रष्टाचाऱ्यांना आशीर्वाद देत आहेत. पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान मोदींच्या डोळ्यांसमोर ‘जुगार’ म्हणजे बेटिंगचा खेळ सुरू होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर अब्जावधी रुपयांची उलाढाल या सट्टेबाजीतून सुरू होती व त्यात पंतप्रधानांचे ‘लाडके’ लोक सामील होते, हे आता उघड झाल्यावर त्यातील तिघांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयात काम करणारा मोदींचा एकदम खासम् खास हिरेन जोशी, प्रसार भारतीचे चेअरमन नवनीत सहगल आणि लॉ कमिशनचे सदस्य हितेश जैन यांना त्यांच्या पदावरून दूर केले म्हणून पंतप्रधान कार्यालयातील पापे धुऊन निघाली असे होत नाही. पंतप्रधानांचे हे तीन खास लोक गेल्या चार वर्षांपासून सत्तेचा, पंतप्रधान कार्यालयाचा वापर करून ‘महादेव’ बेटिंग अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन सट्टेबाजीचा डाव खेळत होते. गेल्या चार वर्षांत या ‘महादेव’ जुगार कंपनीने 50 हजार कोटींची उलाढाल केली. या प्रकरणात अनेक क्रिकेटपटू, अभिनेत्यांना ‘ईडी’, ‘सीबीआय’ने चौकशीला बोलावले. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत हा मुख्य मुद्दा ठरला होता. मोदी छत्तीसगडला येऊन प्रचारात महादेव अॅप व काँग्रेस नेत्यांच्या संबंधांवर बोलत राहिले. ऐन निवडणुकीत तेथील तत्कालीन मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर धाडी टाकल्या व त्यांच्या मुलास महादेव अॅप प्रकरणात अटक केली, पण आता उघड झाले आहे की, महादेव ऑनलाईन सट्टेबाजीचे खरे लाभार्थी पंतप्रधान मोदींच्या कार्यालयातच आहेत व त्यांच्यावर फक्त थातूरमातूर कारवाई केल्याचे नाटक झाले आहे. एरवी काँग्रेस राजवटीतील घोटाळ्यांवर तोंडसुख घेणाऱ्या भाजपचा हा
खरा चेहरा
आहे. काँग्रेसच्या काळात जेव्हा जेव्हा घोटाळे उघड झाले तेव्हा तेव्हा त्यात अडकलेल्यांवर त्या पक्षाने कारवाया केल्या. मग तो ‘आदर्श’ घोटाळा असो, 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा असो, कॉमनवेल्थ क्रीडा घोटाळा असो. या प्रत्येक प्रकरणांत काँगेसने संबंधितांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवले. आता थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत ‘बेटिंग’ घोटाळ्याचे धागेदोरे पोहोचूनही तोंडदेखल्या कारवाईपलीकडे काहीही झालेले नाही. पंतप्रधान कार्यालयात ‘ओएसडी’ म्हणून काम करणारा हिरेन जोशी मोदींचा उजवा हात आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून हे महाशय मोदींचे मीडिया मॅनेजमेंट सांभाळत होते. पंतप्रधान कार्यालयात बसून हिरेन जोशी सर्व मीडिया ग्रुप, चॅनल्स, वृत्तपत्रांवर दबाव आणत असे. कोणती बातमी ब्रेकिंग न्यूज चालवायची हे हिरेन जोशी ठरवत होता. हिरेन जोशीची मीडियाच्या मालकांत व संपादकांत प्रचंड दहशत होती. असा हिरेन जोशी ‘महादेव’ बेटिंगमध्ये सट्टेबाजी करत होता. पंतप्रधान कार्यालयाचा वापर करून त्याने गेल्या चार वर्षांत पैसाच पैसा गोळा केला. या कामात त्याला मदत करणारे हितेश जैन आणि प्रसार भारतीचे प्रमुख नवनीत सहगल होते. या तिघांनी सरकारी पदावर बसून बेकायदा सट्टेबाजी केली. या सट्टेबाजी व्यवहारात हिरेन जोशीचे परदेशी भागीदार आहेत. हे परदेशी भागीदार कोण? याचा खुलासा व्हायला हवा. पंतप्रधान कार्यालयात बसलेला ‘ओएसडी’ बेटिंग माफियाचे रॅकेट चालवत होता. मग देशाची सुरक्षा राम भरोसेच म्हणायला हवी. जो हिरेन जोशी कालपर्यंत मीडियात मोदींच्या नावाने दहशत निर्माण करीत होता, तो पंतप्रधान कार्यालयातून अचानक गायब झाला. महादेव बेटिंग अॅप प्रकरणात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मुलास अटक झाली. काँग्रेसला पुरते बदनाम केले गेले. ईडी, सीबीआयने महादेव अॅपच्या माध्यमातून काँग्रेसला प्रचंड पैसा मिळाला याचे नाट्य उभे केले, पण या
बेटिंगचे खरे सूत्रधार
पंतप्रधानांच्या कार्यालयात होते, हे आता उघड झाले. अर्थात या सूत्रधारांना ईडी, सीबीआयने अद्यापि हात लावलेला नाही. प्रसार भारतीचे चेअरमन नवनीत सहगल या सट्टेबाजीत सामील आहेत. त्यांचा मुलगा शिवा सहगल सट्टेबाजी करणाऱ्या या कंपन्यांचा भागीदार आहे, पण देशाच्या तपास यंत्रणा, देशाचा मीडिया यावर तोंडात बोळा कोंबून बसला आहे. पंतप्रधानांच्या संवेदनशील कार्यालयाचा वापर सट्टेबाजीसाठी चालला असेल तर त्याची जबाबदारी पंतप्रधानांची आहे. सट्टेबाजीत अडकलेले हे तिन्ही लोक पंतप्रधान मोदींचे खास आहेत. त्यामुळे या सट्टेबाजीवर पंतप्रधानांची भूमिका काय? विरोधकांना किरकोळ प्रकरणांत, खोटी प्रकरणे तयार करून अडकवणाऱ्या मोदी-शहा व त्यांच्या तपास यंत्रणांना पंतप्रधान कार्यालयातून झालेले ‘मनी लाँडरिंग’सारखे गुन्हे दिसू नयेत याचे आश्चर्य वाटते. सट्टेबाजीच्या बदल्यात देशाची काही गुप्त माहिती पंतप्रधान कार्यालयातून विकली गेली काय? हादेखील प्रश्न उपस्थित होऊ शकतो. कारण हिरेन जोशी वगैरे ‘माफिया’ पंतप्रधानांबरोबर अनेक विदेश दौऱ्यांवर होते व या काळात हे ‘सट्टेबाज’ विदेशातील त्यांचे भागीदार व इतर ऑनलाईन बेटिंगवाल्यांना भेटल्याचे उघड झाले आहे. देशाच्या पंतप्रधान कार्यालयातच भ्रष्टाचार, जुगार, सट्टेबाजीला ऊत आला आहे. हाच पैसा भाजपच्या राजकारणात आणला जातो. ज्यांच्यावर ‘ईडी’, ‘सीबीआय’च्या कारवाया झाल्या असे उद्योगपती आणि कंपन्यांकडून हजारो कोटींच्या निवडणूक देणग्या घेणाऱ्या भाजपने लाज सोडली आहे. त्यामुळे सर्व सट्टेबाज माफियांना भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ केले जाईल व पंतप्रधान कार्यालयातील सट्टेबाजी व जुगार हा हिंदुत्वाचे प्रतीक म्हणून जाहीर केले जाईल. देशाची प्रतिष्ठा इतकी खालच्या पातळीवर कधीच घसरली नव्हती. पुन्हा या सर्व प्रकारावर मोदींचे मौन आहे. गृहमंत्री पडद्यामागे हालचाली करत आहेत. उद्या पंतप्रधान कार्यालयात ‘सट्टेबाजी’, मनी लाँडरिंग झाले हे विसरण्यासाठी एखादी धर्माची अफू गोळी दिली जाईल, दुसरे काय!




























































