ठसा – बाबा देवरस

>> महेश उपदेव

राज्याच्या उपराजधानीची क्रीडा क्षेत्राची शान म्हणून ओळखले जाणारे चंद्रकांत दा. देवरस (बाबा) यांनी बॅडमिंटन, टेनिस आणि हॉकी खेळात आपल्या विलक्षण चपळाईची चमक देशाला दाखविली. एवढेच नाही तर निवृतीनंतर अनेक बॅडमिंटन खेळाडू घडविले. पराग, समीर या आपल्या मुलांना बॅडमिंटनचे धडे देताना अनेक खेळाडूंना घडविले. या खेळाडूंनी बाबा देवरसांचे नाव हिंदुस्थानात चमकविले. या 93 वर्षीय प्रशिक्षकाची प्राणज्योत नुकतीच मालविली. हिंदुस्थानमधील बॅडमिंटनमधील एक पर्व संपले. दुहेरीतील सर्वोत्तम खेळाडू असा त्यांचा नावलौकिक होता.

बाबा देवरस हे 1986 मध्ये दक्षिण पूर्व रेल्वेमधून अधिकारी पदावरून निवृत्त झाले तेव्हापासून खेळाडू घडवित होते. सीडी यांनी तीन वेळा थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धत प्रतिनिधित्व केले आहे. 1951 ते 1955 मध्ये त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करून आपल्या क्रीडा कारकीर्दीची सुरुवात केली. नागपूर जिमखान्याचे ते हॉकी खेळाडू होते. 1949 ते 1955 या कालखंडत हॉकी, क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस या खेळांत त्यांनी नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. असा विक्रम नागपूरमध्ये कोणत्याही खेळाडूला आजपर्यंत करता आला नाही. आंतरविद्यापीठ स्पर्धतून त्यांनी बॅडमिंटनच्या व्यावसायिक स्पर्धत 1953 मध्ये प्रवेश केला. 1957 मध्ये सीडी यांच्या नेतृत्वात मुंबई विद्यापीठाने जेतेपद खेचून आणले.

सीडी यांची नंदू नाटेकरसारख्या दिग्गज खेळाडूसोबत केलेली दुहेरी भागीदारी त्या क्षेत्रात चर्चेची बाब होती. या चतुरस्र प्रतिभेच्या खेळाडूने 1960 ते 1963 असे तीन वेळा दुहेरीचे जेतेपद पटकावले.

देवरस यांनी आपले पहिले राष्ट्रीय जेतेपद 1957 मध्ये पटकावले होते. 1964 साली सुरेश गोयल, तर 1968 रमण घोष हे दुहेरीतील त्यांचे भागीदार होते. राष्ट्रीय स्तरावर त्यांना तीन क्रमांकाचे सिडींग देण्यात आले होते. सीडी यांनी दुहेरी भागीदारीत चार वेळा राष्ट्रीय अजिंक्यपद मिळविले. Western india, cci east india स्पर्धत त्यांनी जेतेपद मिळविले. एवढेच काय तर त्यांना मुंबईच्या माटुंगा क्लबने आपले सदस्यत्व बहाल केले होते. देशातील नामांकित मोजक्या खेळाडूंना या क्लबने सदस्यत्व बहाल केले आहे. बालाघाट येथे गव्हर्नमेंट स्कूलमधून देवरस यांनी शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पदव्युत्तर पदवीसाठी मुंबईला गेले. खालसा कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. यादरम्यान एअर इंडियात नोकरी करून 1986 मध्ये दक्षिण पूर्व रेल्वेमधून सेवा निवृत्ती स्वीकारली. नंदू नाटेकर यांच्यासोबत देवरस यांनी थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेत, 1964 मध्ये न्यूझीलंड येथे आणि 1968 मध्ये जयूपर येथे हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले. बॅडमिंटनमधून सक्रिय निवृत्ती घेतल्यानंतर देवरस सरांनी रेल्वेच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणे सुरू केले. त्यांची शेवटची मोठी स्पर्धा ऑल इंग्लंड वेटर्नस बॅडमिंटन चॅम्पियनशीप ठरली. देवरस सरांनी नागपूरच्या प्रतापनगरमधील सहकार मंदिरात उद्योन्मुख खेळाडूंना घडविणे सुरू केले. अनेक राष्ट्रीय खेळाडू निर्माण केले. एवढेच नाही तर सरांची दोन मुले पराग, समीर राष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू आहेत. देवरस सरांचे मार्गदर्शन लाभलेले खेळाडू महान आहेत. सरांच्या कारकीर्दीची दखल घेऊन एसजेएनने त्यांचा गौरव केला आहे. अशा महान व्यक्तीचा गौरव करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार मात्र उदासीन राहिले. या महान खेळाडू, प्रशिक्षकाचा यथोचित सन्मान व्हायलाच हवा होता, पण सरकारने अशा त्यांना उपेक्षितच ठेवले. बाबा देवरस यांची दुसरी ओळख म्हणजे रा. स्व. संघाचे तिसरे माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे ते पुतणे होते. नेहमी प्रसिद्धीपासून दूर राहणाऱया बाबा देवरस यांनी कधीही त्यांच्या कामगिरीचा आणि योगदानाचा गवगवा केला नाही.