महाराष्ट्रासह नऊ राज्यांत पाण्याची गुणवत्ता खालावली

वाढत्या जलप्रदूषणामुळे भूजलाची गुणवत्ता सतत खालावत आहे. देशातील नऊ राज्यांमधील भूजलामध्ये प्रदूषण, अनेक भागांत खारटपणा, नायट्रेट आणि अन्य धातूंचे प्रमाण अधिक आढळले आहे.

केंद्रीय भूजल बोर्डाच्या अहवालानुसार, जून 2024 ते मार्च 2025 दरम्यान पाण्यात नायट्रेट, फ्लोराईड, क्रोमियम, मँगनीज, आर्यन, निकेल, कोबाल्ट, झिंक, आर्सेनिक, पॅडमियम, शीसे आणि जस्त यांसारख्या घटकांचे प्रमाण मानकांपेक्षा जास्त आढळले. ही समस्या  आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, कर्नाटक, हरयाणा आणि उत्तर प्रदेशात आढळली आहे. या राज्यांतील काही भागांतील पाण्यात खारटपणा, नायट्रेट आणि अन्य धातूंचे प्रमाण जास्त दिसून आले आहे, तर उत्तर-पूर्वेकडील राज्यांमध्ये लोह, मँगनीज, आर्सेनिक यांची मात्रा जास्त आढळली.

अभ्यासकांच्या मते भूजलामध्ये धातूंचे प्रमाण जास्त आढळल्यास केवळ पाणी प्रदूषित होत नाही, तर आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. कॅन्सर, त्वचारोग, हृदयविकार, किडनी, मेंदूचे आजार होण्याची शक्यता आहे. दूषित पाणी सिंचनासाठी वापरल्यावर माती प्रदूषित होऊ शकते. प्रदूषित मातीमध्ये उगवणारी रोपे, झाडे ही मानव आणि प्राण्यांच्या खाद्यशृंखलेत जातात. दूषित पाण्याचा जलचरांना धोका निर्माण होऊ शकतो. जलशक्ती राज्यमंत्री राज भूषण चौधरी यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले की, सीजीडब्ल्यूबीच्या वार्षिक भूजल गुणवत्ता 2025 अहवालानुसार मान्सून पूर्व व मान्सूननंतर 2024 दरम्यान बोर्डाने 26 राज्ये, केंद्रशासित राज्यांतून आर्सेनिकसाठी 3415 भूजल नमुने आणि जस्तासाठी 21 राज्ये, पेंद्रशासित प्रदेशांतून 2537 नमुने गोळा करून त्यांचे मूल्यांकन करण्यात आले.