
पाकिस्तानचा आर्थिक कणा मोडकळीस आला असून कर्जाच्या जोरावर देशाचा कारभार सुरू आहे. पाकिस्तान मागील अनेक महिन्यांपासून आर्थिक अडचणींचा सामना करत असून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे पाकिस्तानने (आयएमएफ) पदर पसरला होता. मात्र आयएमएफच्या कडक अटींनी जखडलेला पाकिस्तान आता त्यांची राष्ट्रीय विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स विकणार आहे.
कर्ज आणि पॅकेजवर टिकून राहिलेल्या पाकिस्तानला त्यांची पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स (पीआयए) ची विक्री करावी लागणार आहे. बोलीसाठी पूर्व-पात्र ठरलेल्या चार कंपन्यांमध्ये फौजी फर्टिलायझर कंपनी लिमिटेडचा समावेश आहे. जी लष्कर नियंत्रित फौजी फाऊंडेशनचा भाग आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी बोली लावणाऱया कंपन्यांशी भेट घेतली. पीआयएसाठी बोली लावण्याची प्रक्रिया 23 डिसेंबर 2025 रोजी सुरू होणार असल्याची घोषणा त्यांनी केली. याचे देशभर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.



























































