
सांगली जिह्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू झाला. पहिल्या महिन्यात तब्बल 22 लाख 50 हजार 516 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 20 लाख 86 हजार 786 क्विंटल साखरेचे उत्पादन मिळाले. मात्र, साखर उतारा अवघा 9.27 टक्के दाखविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
कुंडलच्या क्रांती कारखान्याने सर्वाधिक 2 लाख 61 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून आघाडी घेतली आहे. अतिवृष्टी आणि सातत्याने झालेल्या पावसामुळे उसाचे उत्पन्न घटल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, कारखानदारांनी साखरेचा उतारा कमी दाखवून गोलमाल केल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून केला जात आहे.
साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले होते. संघटनेकडून कोल्हापूर जिह्यात ज्या कारखान्यांची 3500 पेक्षा कमी एफआरपी आहे, अशा कारखान्यांनी 3500 रुपये आणि ज्या कारखान्यांची 3400 पेक्षा अधिक एफआरपी अधिक 100 रुपये, असा फॉर्म्युला मान्य केला आहे. त्या धर्तीवर सांगली जिह्यातील साखर कारखान्यांनी मान्य करण्याची मागणी केली होती. मात्र, कारखान्यांच्या प्रतिनिधींनी हा फॉर्म्युला अमान्य करीत दराबाबत भूमिका जाहीर करण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मध्यस्थीने मुदत घेतली. मुदत संपत असताना खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांनी स्वतःहून ऊसदराची कोंडी फोडली. बहुतांशी कारखान्यांनी 3500 आणि काही कारखान्यांनी 3400 रुपयांपेक्षा जादा दर देण्याचे जाहीर केले आहे. जिह्यातील ऊसदराचा तिढा सुटल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. त्यामुळे जिह्यातील साखर कारखानदारांनी गाळप जोरदार सुरू केले.
सांगली जिह्यात यंदाच्या हंगामात 10 सहकारी, तर पाच खासगी अशा एकूण 15 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. गाळप हंगाम सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी झाला. चालूवर्षी मे महिन्यापासून सातत्याने पाऊस होत आहे. याशिवाय पूर, अतिवृष्टी यामुळे उसाची अपेक्षित वाढ
झालेली नाही.
कारखाने सुरू झाल्यानंतरही पाऊस सुरू राहिल्याने गाळपावर परिणाम झाला होता. नोव्हेंबरच्या दुसऱया आठवडय़ापासून पावसाने उसंत घेतली असून, कारखान्यांच्या गाळपास गती आली आहे. डफळापूर (ता. जत) येथील श्रीपती शुगरने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात गाळप सुरू केले आहे. इतर साखर कारखानदारांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात गाळपाला सुरुवात केली आहे.
कुंडल येथील क्रांती साखर कारखाना गाळपात आणि साखर उत्पादनात आघाडीवर आहे. तर, सुरुल येथील राजारामबापू कारखाना हा उताऱयात अव्वल आहे. खानापूर येथील ‘यशवंत शुगर’चे गाळप आणि साखर उत्पादनात सर्वांत मागे आहे. चालूवर्षी उसासाठी साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. जिह्यात कोल्हापूर जिह्यातील वारणा, दालमिया आसुर्ले पोर्ले, शरद नरंदे, जवाहर इचलकरंजी या कारखान्यांकडून ऊस नेला जात आहे. त्यामुळे जिह्यातील कारखान्यांना यंदा उसासाठी संघर्ष करावा लागणार असल्याचे चित्र आहे.
एकीकडे उसाचे उत्पन्न घटले असल्याने शेतकऱयांची डोकेदुखी वाढली आहे. असे असताना उसाचा उतारा कमी दाखवत कारखान्यांकडून गोलमाल केला जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.
कारखान्यांचे गाळप
कारखाना गाळप साखर
(टनात) (क्विंटल)
दत्त इंडिया 216065 203170
राजारामबापू 184540 183500
विश्वासराव नाईक 133380 124400
राजारामबापू 128330 138900
राजारामबापू 86385 92520
राजारामबापू 88095 80005
हुतात्मा 126560 118375
सोनहिरा 257780 203170
श्रीपती शुगर 151940 158600
उदगिरी 162516 102650
क्रांती 261850 227450
मोहनराव शिंदे 136530 142250
दालमिया 121180 124400
यशवंत शुगर 51690 52420
सद्गुरु श्री 143675 119526
एकूण 2250516 2086786
उतारा चोरल्याची तक्रार करणार – संदिप राजोबा
मे महिन्यापासून सातत्याने पाऊस होत असल्याने उसाची अपेक्षित वाढ झालेली नाही. उसाचे उत्पन्न घटले असताना साखर कारखाने उसाचा उतारा चोरत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदिप राजोबा यांनी केला. याबाबत मुख्यमंत्री तसेच साखर आयुक्तांकडेही लवकरच तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.




























































