
मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली. रतलाम जिल्ह्यातील जावरा येथील एका कारखान्यात क्लोरीन गॅसची गळती झाली. यामुळे तेथील कामगार आणि परिसरातील लोकांना मळमळ, डोळ्यांत जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या कारखान्यात गॅस गळती झाली त्याचे नाव केमिकल लॅबोरेटरिज आहे.या कारखान्यात फेरिक सल्फाइड रसायने तयार केली जातात.शनिवारी संध्याकाळी कारखान्यातील एका सिलेंडरमधून अचानक क्लोरीन वायूची गळती झाली, असे वृत्त आहे. काही वेळातच हा वायू आजूबाजूच्या परिसरात पसरला, ज्यामुळे जवळपासच्या कारखान्यांमधील कामगारांमध्ये आणि उपस्थित असलेल्या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यांना उलट्या आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
क्लोरीन गॅस गळती झाल्यानंतर गॅसच्या संपर्कात आल्यानंतर दोन कामगार आणि तीन अग्निशमन दलाचे कर्मचाऱ्यांची तब्येत बिघडली असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांना सरकारी आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळताच जिल्हाधिकारी मीशा सिंह आणि पोलिस अधिक्षक अमित कुमार घटनास्थळी पोहोचले. क्लोरीन वायूची एका जुन्या गॅस सिलेंडरमधून गळती झाली. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्य़ांनी स्पष्ट केले. तसेच या घटनेमुळे कारखान्यांना सुट्टी देण्यात आली आणि काम थांबवण्यात आले आहे.



























































