महिनाभरात 273 प्रदूषणकारी बांधकामे बंद, नियमावली पाळली नसल्याने धडक कारवाई

मुंबईमध्ये प्रदूषण नियंत्रण नियमावली पाळत नसलेल्या 273 ठिकाणी पालिकेने काम बंद करण्याची कारवाई केली आहे. पालिकेच्या पाहणीत या ठिकाणी प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावूनही कोणतीही कार्यवाही केली नसल्याने पालिकेने ही बांधकामे अखेर बंद केली. यामध्ये सरकारी बांधकामांसह इमारती, विविध प्राधिकरणे, पालिकेची कामे आणि रस्ते कामांचाही समावेश आहे.

मुंबईत वाढलेल्या प्रदूषणाला बांधकांम प्रकल्पांच्या ठिकाणाहून बाहेर येणारी धूळ कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पालिकेने बांधकाम प्रकल्पांसाठी 28 प्रकारची नियमावली जाहीर केली आहे. ही नियमावली बांधकामाच्या ठिकाणी पाळणे अनिवार्य आहे. यावर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेने सर्व 27 वॉर्डमध्ये 94 भरारी पथकांची नेमणूक केली आहे. या पथकांच्या तपासणीत प्रदूषण नियंत्रण नियमावली पाळत नसल्याचे निदर्शनास आल्यास पालिकेकडून सुरुवातीला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून ठराविक काळ दिला जातो. यामध्ये प्रदूषण नियंत्रण नियमावली पाळली नाही तर थेट बांधकाम बंद करण्याची कारवाई करण्यात येते.

11 महिन्यांत 3770 ठिकाणी ‘स्टॉप वर्क’

 मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी हिवाळय़ासह संपूर्ण वर्षभर प्रदूषण नियंत्रण नियमावली पाळण्याची गरज आहे. त्यामुळे मुंबईतील वाढते प्रदूषण पाहता पालिकेकडून वर्षभर ही कारवाई करते.

जानेवारी 2025 ते नोव्हेंबर 2025 या अकरा महिन्यांच्या कालावधीत पालिकेने एकूण 9155 प्रकल्पांना ‘शो कॉज’ नोटीस बजावली आहे, तर 3770 ठिकाणी ‘स्टॉप वर्क’ कारवाई केली.

अशी आहे नियमावली

वायू प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेने 5 ऑक्टोबर 2024 रोजी 28 प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये बांधकाम प्रकल्पाच्या सभोवताली धूळ प्रदूषण रोखण्यासाठी पत्र्यांचे कुंपण उभारणे, हिरव्या कपडय़ाचे आच्छादन करणे, पाणी फवारणी करणे, राडारोडय़ाची शास्त्राsक्तरित्या साठवण व ने-आण करणे, बांधकामाच्या ठिकाणी वायू प्रदूषण मोजमाप करणारी यंत्रणा बसवणे, धूरशोषक यंत्र बसवणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. शिवाय शेकोटी पेटवणे, उघडय़ावर कचरा जाळण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

1194 नोटीस घेतल्या मागे

पालिकेच्या कारवाईनंतर वर्षभरात 1194 ठिकाणी प्रदूषण नियंत्रण नियमावली पाळण्याच्या उपाययोजना करण्यात आल्याने पालिकेने बजावलेली ‘शो कॉज’ नोटीस मागे घेण्यात आली आहे. 2576 ठिकाणी अजूनही कारणे दाखवा नोटीस मागे घेण्यात आलेली नाही.

बोरिवलीत सर्वाधिक 544 नोटिसा

पालिकेने 11 महिन्यांत केलेल्या कारवाईत सर्वाधिक 544 नोटिसा या आर/मध्य विभाग बोरिवलीत बजावल्या आहेत. तर सर्वात कमी म्हणजे ‘ए’ पर्ह्ट विभागात बजावण्यात आलेल्या 25 कारणे दाखवा नोटीसमध्ये एका ठिकाणी स्टॉप वर्क कारवाई करण्यात आली आहे.