
संपूर्ण राज्यभर निवडणूक होणार असून त्याचा परिणाम दहावी व बारावीच्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणार आहे. यामुळे परीक्षा पुढे ढकलता याव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी केली आहे. विधानपरिषदेत बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे.
सचिन अहिर म्हणाले आहेत की, “आताच नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, काही दिवसात जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका होतील. यातच दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील फेब्रुवारी- मार्चमध्ये होणार आहेत. गावागावात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. यामुळे एकंदरीत जे वातावरण आहे, याचा परिणाम परीक्षा आणि शिक्षणावर होणार. म्हणून माझी विनंती आहे की, शासनाने याबद्दल एक कार्यक्रात ठरवावा, कारण आता आचारसंहिता लागू झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात निवडणुका होणार आहेत. याचा परिणाम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांवर होणार आहे. पवित्र पोर्टलची देखील शिक्षणमंत्र्यांनी घोषणा केली होती. हजारो विद्यार्थ्यांच्या भरतीचा प्रश्न आहे. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलता येतील का? याबद्दल शासनाने निर्णय घ्यावा.”

























































