अनिल अंबानींच्या मुलावर फसवणुकीचा आरोप, वाचा नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांचे पुत्र जय अनमोल अंबानी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये २२८.०६ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा सीबीआयने दाखल केला आहे. हा खटला रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि संबंधित कर्ज थकबाकीशी संबंधित आहे. या प्रकरणात अनिल अंबानी यांना यापूर्वीही अनेकदा कारवाईचा सामना करावा लागला आहे.

युनियन बँकेच्या तक्रारीनंतर सीबीआयने जय अनमोलविरुद्ध एफआयआर दाखल केला. तक्रारीत रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडच्या संचालक म्हणून त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडने व्यवसायासाठी दिलेले कर्ज वळवण्यात आल्याचा दावा बँकेने केला आहे, ज्यामुळे ₹२२८.०६ कोटींचे नुकसान झाले.

अनिल अंबानी रिलायन्स ग्रुपची 1 हजार 120 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडने युनियन बँकेच्या मुंबई एससीएफ शाखेतून ₹४५० कोटींचे कॉर्पोरेट कर्ज घेतले होते. कर्जाच्या नियमांनुसार, ईएमआय, व्याज आणि आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक होते. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये असेही उघड झाले की कर्जाची रक्कम त्याच्या हेतूपेक्षा वेगळ्या उद्देशासाठी वापरली गेली. पैसे अशा क्षेत्रात गुंतवले गेले ज्यासाठी बँकेने ते मंजूर केले नव्हते.

ग्रँट थॉर्नटनच्या फॉरेन्सिक अहवालात असेही आढळून आले की २०१६ ते २०१९ दरम्यान निधी वळवण्यात आला. संचालकांनी फसवणूक आणि विश्वासघात करून फसवणूक केल्याचा बँकेचा आरोप आहे. शिवाय कंपनीने वेळेवर ईएमआय भरण्यात अपयशी ठरल्यामुळे ३० सप्टेंबर २०१९ रोजी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड खाते एनपीए घोषित करण्यात आले.

फंड वळवण्याच्या वेळी जय अनमोल रिलायन्स होम फायनान्सचे कार्यकारी संचालक होते. त्यांनी आणि इतर संचालकांनी बँकेला खोटी माहिती दिली आणि अटी व शर्तींचे उल्लंघन केले असा सीबीआयचा आरोप आहे. सीबीआयने भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम १२० ब (गुन्हेगारी कट) आणि कलम ४२० (फसवणूक) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.