
माझगाव ताडवाडी बीआयटी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मागील चार अधिवेशनांपासून मांडत आहेत, पण सरकार त्यावर निर्णय घेत नाही. बीडीडी व अभ्युदय नगरच्या धर्तीवर धोरणात्मक निर्णय घेऊन माझगाव ताडवाडीच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी शिवसेना आमदार मनोज जामसुतकर यांनी विधानसभेत केली.
बीआयटी चाळींच्या सोळा इमारती व ए, बी, सी ब्लॉक असे तेराशे भाडेकरू आहेत. हा पुनर्विकास प्रकल्प गेल्या तीस वर्षांपासून प्रलंबित आहे. पुनर्विकासासाठी मुख्यमंत्र्यांना पाच वेळा पत्र पाठवले. बैठकीची वेळ मागितली. पण एक वर्षापासून वेळ दिलेला नाही. या ताडवाडीतील सर्वसामान्यांना न्याय द्यायचा नाही का, असा उद्विग्न सवाल त्यांनी केला. अधिवेशन संपल्यावर तरी पुनर्विकासासाठी बैठक बोलावावी. अशी मागणी जामसुतकर यांनी केली.
नऊ वर्षे हे रहिवासी संक्रमण शिबिरात खितपत पडले
या चाळीतील 220 रहिवासी माहुलसारख्या प्रदूषित भागातील संक्रमण शिबिरात नऊ वर्षे हे रहिवासी त्या ठिकाणी खितपत पडले आहेत. त्यांना त्वचारोग, केसगळती तसेच त्यांचे आयुष्य कमी झाले आहे. त्यांना तातडीने माझगावमध्ये स्थलांतरित करावे. या चाळीत पालिका, पोलीस वर्षानुवर्षे वास्तव्यास आहेत. पुनर्विकासानंतर त्यांना कायमस्वरूपी मालकी हक्काचे घर मिळावे. अशी मागणी जामसुतकर यांनी केली.



























































