Delhi Air Emergency – विषारी हवा अन् दाट धुक्यात अडकलं पंतप्रधान मोदींचं विमान; फुटबॉलपटू मेस्सीलाही फटका

देशाची राजधानी दिल्ली प्रदूषण आणि दाट धुक्यात हरवून गेली आहे. दिल्लीतील वायू प्रदूषणाची स्थिती अतिशय चिंताजनक असून अनेक भागांत हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) हा 500 च्या वर होता. याचा थेट फटका विमान आणि रेल्वे वाहतुकीला बसला आहे. सोमवारी सकाळी जवळपास 66 विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले, तर 400 हून अधिक विमानांच्या उड्डाणास उशीर झाला. याचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही बसला. त्यांचे विमान जवळपास एक तासभर विषारी हवा आणि दाट धुक्यामध्ये अडकले होते, असे वृत्त ‘इंडिया टूडे‘ने दिले आहे.

सोमवारी सकाळी दिल्लीत दाट धुक्याची चादर पसरली होती. त्यात जीवघेण्या प्रदुषणामुले दृश्यमानताही अक्षरश: शून्य झाली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. याचा थेट परिणाम हवाई आणि रेल्वे वाहतुकीवर झाला. फुटबॉलपटू लिओनल मेस्सी याची दिल्लीतील एन्ट्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परदेश दौराही यामुळे प्रभावित झाला.

दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर फुटबॉलपटू मेस्सीचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु धुके आणि विषारी हवेमुळे मेस्सीच्या विमानाचे दिल्लीतील लॅण्डिंग उशिराने होत असल्याचे वृत्त पीटीआयने दिले. एवढेच नाही तर अरुण जेटली मैदानावर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचे आगमन झाल्यावर मेस्सीच्या चाहत्यांनी AQI AQI AQI… ची घोषणाबाजी करत त्यांना डिवचले.

मोदींच्या परदेश दौऱ्याला फटका

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या तीन देशांच्या दौऱ्याला रवाना झाले. मात्र सोमवारी सकाली विषारी हवा आणि धुक्याच्या कचाट्यात त्यांचे विमान सापडले होते. ऑरेंज अलर्ट देण्यात आल्यामुळे आणि कमी दृश्यमानतेमुळे पंतप्रधान मोदींचे विमान सकाळी 8 वाजून 30 मिनिटे या नियोजित वेळेऐवजी 9 वाजून 30 मिनिटांनी उडाले. यावरून दिल्लीतील परिस्थिती किती गंभीर आहे हे दिसून येते.

दिल्लीकरांची दुहेरी कोंडी

दिल्लीमध्ये थंडीची लाट आली आहे. सोमवारी सकाळच्या सत्रात तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याची माहिती हवामान विभागाने दिली. तसेच हवेची गुणवत्ताही अनेक भागांमध्ये 400 ते 500 पर्यंत खालावली. बोचरी थंडी आणि प्रदूषण अशा दुहेरी कोंडीमध्ये दिल्लीकर अडकला आहे.