सेल्फीच्या बहाण्यानं जवळ आला आणि धाड धाड गोळ्या झाडल्या; सामना सुरू असताना कबड्डी खेळाडूवर जीवघेणा हल्ला

पंजाबमधील मोहाली येथे सोमवारी कबड्डी सामन्यादरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार गेला. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या मैदानात ही घटना घडल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. हल्लेखोरांनी कबड्डी स्पर्धेचा आयोजक आणि खेळाडू राणा बलाचौरिया यांच्यावर गोळ्या झाडल्या. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास झालेल्या या गोळीबारात राणा बलाचौरिया डोक्यात गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मोहालीतील सेक्टर 82 येथील एका मैदानात कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डीचा सामना सुरू असताना बोलेरो गाडीतून आलेले हल्लेखोर मैदानात आले. सेल्फीच्या बहाण्याने हल्लेखोर राणा बलाचौरिया यांच्याजवळ गेले आणि गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून खेळाडू आणि प्रेक्षकांनीही मैदानात धाव घेतली. गोळीबाराचा हा आवाज सामन्याच्या लाईव्ह रेकॉर्डिंगमध्येही कैद झाला आहे. बलाचौरिया यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गोळ्या लागल्याने असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. ‘हिंदुस्थान टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर बोलेरो गाडीतून आले होते आणि कबड्डी सामन्यासाठी संघ मैदानात प्रवेश करत असताना त्यांनी गोळीबार केला. सुरुवातीला अनेकांना हा फटाक्यांचा आवाज असावा असे वाटले, मात्र मैदानात थेट गोळ्या चालवण्यात आल्याचे समोर येताच गोंधळ निर्माण झाला.

पोलीस उपअधीक्षकांची पाठ फिरली अन्…

विशेष म्हणजे पोलीस उपअधीक्षक एच. एस. बाल हे या कार्यक्रमाचे प्रमुक पाहुणे होते. ते कार्यक्रमस्थळावरून निघून गेल्यावर ही गोळीबाराची घटना घडली. पंजाबी गायक मनकीरत औलख हा देखील या स्पर्धेला उपस्थित राहणार होता. मात्र गोळीबाराची घटना कळताच त्याने गाडी वळवली.

हल्लेखोर फरार, शोधमोहीम सुरू

दरम्यान, गोळीबारानंतर हल्लेखोर तात्काळ घटनास्थळावरून फरार झाले. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांची शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

फिरोजपूरमध्येही कबड्डी खेळाडूवर गोळीबार

धक्कादायक म्हणजे रविवारी फिरोजपूर मतदारसंघातील एका गावात कबड्डी खेळाडू निर्वेल सिंग यालाही एका व्यक्तीने गोळी मारली होती. गोळी निर्वेलच्या मांडीला लागली होती. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम आदमी पक्षाचे आमदार नरेश कटारिया यांनी जखमी खेळाडूची रुग्णालयात भेट घेत त्याच्या तब्येतीची विचारपूस केली आणि आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल असे आश्वासनही दिले.