Pune Porsche Case – मुंबई उच्च न्यायालयाचा विशाल अगरवालला दणका; जामीन पुन्हा फेटाळला

पुण्यातील कल्याणीनगरमधील हिट अॅण्ड रन प्रकरणात दोन निष्पाप इंजिनीअर तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपी विशाल अगरवाल याला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. उच्च न्यायालायने विशाल अगरवाल याचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला आहे. त्यामुळे गेल्या 17 महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या विशाल अगरवालचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

कल्याणीनगर परिसरात बेदरकारपणे अलिशान मोटार चालवून मद्यधुंद अल्पवयीन मुलाने दोघांचा जीव घेतला होता. मुलाला वाचवण्यासाठी बांधकाम उद्योजक असलेल्या विशाल अगरवाल याने वैद्यकीय अहवालात छेडछाड केलीचे निदर्शनास आले होते. त्यानंतर विशाल अगरवाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. गेल्या 17 महिन्यांपासून विशाल तुरुंगात असून आता पुन्हा एकदा न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला आहे.

काय आहे प्रकरण…

पुण्यातील कल्याणीनगर येथे मे, 2024 मध्ये ही घटना घडली होती. अल्पवयीन मुलाने आलिशान पोर्शे कार भरधाव चालवत दोन बाईकस्वारांना चिरडले होते. यातील मुख्य व सहआरोपी अल्पवयीन आहेत. घटना घडली तेव्हा हे दोन्ही आरोपी दारू प्यायले होते. या घटनेने एकच खळबळ उडाली. आरोपींना वाचवण्यासाठी राजकीय बळ वापरले गेल्याचा आरोप झाला. अल्पवयीन सहआरोपीच्या रक्ताचे नमुनेही बदलण्यात आले होते. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.