
गेवराई विधानसभा मतदारसंघात भविष्यामध्ये राजकीय संघर्ष कसा असेल याची नांदी आत्ताच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत पाहाण्यास मिळाली. राजकीय राड्यामुळे गेवराई मतदारसंघातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. मतदानाच्या दिवशी झालेल्या हाणामारी प्रकरणात भाजपाचे नेते तथा माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू बाळराजे पवार यांना पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गेवराईमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गेवराई नगरपालिका मतदान प्रक्रिया दरम्यान २ डिसेंबर रोजी दुपारी शहरात राजकीय वाद विकोपाला गेला होता. दोन गट समोरासमोर आले होते. भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता. हाणामारी, दगडफेक, गाड्यांच्या काचा फोडणे, माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या खासगी सहाय्यकावर मारहाण केल्याचा आरोप या घटनेने गेवराईतील राजकारण तापले होते. या प्रकरणी पोलिसांनी स्वत:हून फिर्याद दाखल केली होती.
तब्बल पंधरा दिवसानंतर गेवराईच्या राड्या प्रकरणी पोलिसांनी भाजपाचे नेते बाळराजे पवार यांना मध्यरात्री ताब्यात घेतले. मात्र बाळराजे पवार हे स्वत:हून पोलिसांत हजर झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना अटक करण्यात आली असून गेवराईमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गेवराईतील राड्या प्रकरणी ५० जणांविरूद्ध गुन्हे दाखल आहेत. त्यातील काही आरोपींना ताब्यात घेऊन नोटीस बजावण्यात आली होती. तापासादरम्यान भाजपाचे नेते बाळराजे पवार यांच्यावरील आरोपांची व्याप्ती आणि गुन्ह्यातील कलमामध्ये वाढ झाल्याने पोलिसांनी पाऊल उचलले. या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
गेवराई पवार आणि पंडित या दोन राजकीय घराण्यामधील संघर्ष फार जुना आहे. नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून हा संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. यामुळे आगामी काळात गेवराईतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.




























































