
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत विविध राजकीय मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. मुंबई हा या चर्चांचा मुख्य केंद्रबिंदू असून काल दोन्ही पक्षांमध्ये सविस्तर चर्चा झाली आहे. बहुधा आज या चर्चेला पूर्णविराम मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आज संध्याकाळनंतरही मनसेचे नेते आणि शिवसेनेचे नेते मंडळ अंतिम हात फिरवण्यासाठी बसले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत म्हणाले की, केवळ मुंबईच नव्हे तर ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे आणि नाशिक या शहरांमधील जागावाटपाबाबतही चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. येत्या एक-दोन दिवसांत सर्व बाबी निश्चित झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र बसतील आणि त्यानंतर ज्या घोषणेची सर्वांना उत्सुकता आहे, ती घोषणा केली जाईल. आमच्यात कोणताही विसंवाद नाही, कोणताही गोंधळ नाही. सध्या सत्ताधारी महामहायुतीमध्ये जे काही सुरू आहे, तसा प्रकार आमच्याकडे अजिबात नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
काँग्रेस सध्या या आघाडीचा भाग नसल्याचे नमूद करत राऊत म्हणाले की, काँग्रेसला स्वबळावर लढायचे आहे. शरद पवार साहेबांशी चर्चा होईल, मात्र मुंबईतील मुख्य लढत ही शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील आघाडीचीच असेल. ही आघाडी सत्ताधाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे करेल आणि महाराष्ट्राला तसेच मुंबईला जाग आणण्याचे काम ही आघाडी नक्की करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शक्तीप्रदर्शनाच्या चर्चेवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “शक्तीप्रदर्शन” हा शब्द आम्हाला योग्य वाटत नाही. उगाचच दंडावरच्या बेडक्यांसारखे काही दाखवायचे नाही. मात्र जेव्हा युतीची घोषणा होईल आणि पहिला मेळावा होईल, तेव्हा मुंबईतील मराठी माणूस हा तिथे ओसंडून वाहताना दिसेल, याची मला खात्री आहे. युती आणि जागावाटपाची घोषणा पत्रकार परिषदेत करायची की मेळाव्याच्या माध्यमातून करायची, यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवाजी पार्कवरील सभेच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले की, शिवाजी पार्कवर सभा व्हावी, अशी सर्वच पक्षांची इच्छा आहे. शिंदे गट, मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महापालिकेकडे अर्ज केले आहेत. मात्र शिवतीर्थाशी भावनिक, ऐतिहासिक आणि राजकीय संबंध हे केवळ ठाकरे कुटुंबाचेच आहेत. शिंदे गटाचा शिवतीर्थाशी काय संबंध आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अमित शाहांनी तुमचा पक्ष ताब्यात दिला म्हणून शिवतीर्थाशी तुमचा संबंध निर्माण होत नाही. तुम्ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी आहात. तुमचा नैसर्गिक जन्म नाही. निवडणूक आयोगाचे डॉक्टर आणि सर्वोच्च न्यायालयाचे डॉक्टर एकत्र येऊन तुम्हाला तात्पुरता जन्म दिला आहे, असे तीव्र शब्दांत त्यांनी टीका केली.
भाजप आणि शिंदे गटाच्या युतीवर हल्ला चढवताना संजय राऊत म्हणाले की, ही युती अमित शाहांनी लादलेले लग्न आहे. ही वधू मनाने मोडलेली आहे, पण भाजपच्या चरणाशी बसण्याचा निर्णय शिंदे गटाने घेतला आहे. त्यातूनच सगळे गोंधळ सुरू आहेत. भाजपची महाराष्ट्रातील युनिट ही डुप्लिकेट शिवसेना आहे आणि त्यांच्यासोबत कोणत्याही परिस्थितीत काम करायला आम्ही तयार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा केवळ मुंबईतच नव्हे, तर ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे आणि राज्यातील इतर भागांतही होतील. ही केवळ मुंबईची नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राची गरज आहे. ठाकरे बंधूंनी जास्तीत जास्त ठिकाणी जाऊन लोकांना संबोधित करावे, हा आमचा प्रयत्न राहील, असे राऊत म्हणाले. जातीयवादी आणि धर्मांध शक्तींविरोधात शिवसेना आणि मनसेची युती प्रभावीपणे लढू शकते आणि त्यांना पराभूत करू शकते, हे आमच्या दलित बांधवांना आणि मुस्लिम बांधवांना माहिती आहे, असेही त्यांनी नमूद केले.
नवाब मलिक प्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, नवाब मलिक यांची एक कन्या सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देते आणि सत्ताधारी पक्षात आहे. मग तुम्ही राष्ट्रभक्तीचे ढोंग कसे करता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नवाब मलिक हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. अजित पवारांचा विषय आहे. मात्र कृपया राष्ट्रभक्तीचे ढोंग करू नका, असा टोला त्यांनी लगावला.
प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे दिल्लीमध्ये अमित शाह किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटतात, यात नवीन काही नाही. ते त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांना, त्यांच्या मायबापांना भेटतात, हे मान्य करावे लागेल. आम्ही दिल्लीला जात नाही. आमचे सर्व राजकारण मुंबई आणि महाराष्ट्रात आहे. मिंधे मात्र दिल्लीला जातात, कृष्ण मेनन मार्गावरच्या हिरवळीवर गवतावर बसतात आणि पांढऱ्या पँटला गवत लावून परत येतात. दिल्ली आणि महाराष्ट्राच्या वाटेवर भाजपने या सगळ्यांचे पायपुस केले आहे, असा घणाघात त्यांनी केला.
पक्षांतर बंदी कायद्यावर बोलताना राऊत म्हणाले की, सध्याच्या कायद्यात कठोर नियम आणि तरतुदी आहेत. मात्र निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद आहे. निवडणूक आयोगाने हरिश्चंद्राची भूमिका घ्यायला हवी होती, पण तो हरामखोरांची भूमिका घेत आहे. त्यामुळेच पक्षांतरबंदी कायद्याची अंमलबजावणी होत नाही. घटनेच्या दहाव्या अनुसूचीनुसार शिंदे गटासोबत गेलेले 40 ते 42 आमदार अपात्र ठरायला हवे होते. मात्र निवडणूक आयोगाने आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी कायदा काय करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मध्यप्रदेशचे उदाहरण देत संजय राऊत म्हणाले की, दिग्विजय सिंग यांची तळमळ समजण्यासारखी आहे. मध्यप्रदेशमध्ये माधवराव शिंदे यांचा मुलगा ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत 22 आमदार फुटले आणि निवडून आलेले सरकार पाडण्यात आले. महाराष्ट्रात जे घडले तेच इतर राज्यांमध्येही घडत आहे. झारखंडमध्येही सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्ली आणि निवडणूक आयोगात जोपर्यंत हरामखोरांचे राज्य आहे, तोपर्यंत पक्षांतर बंदी कायदा त्यांच्या कोठीवर नाचवला जाईल, अशी टीका त्यांनी केली.
यावेळी संजय राऊत यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील खळबळजनक दावा करत सांगितले की, 19 डिसेंबरला अमेरिकेच्या संसदेमध्ये किंवा संसदबाहेर काही महत्त्वाचे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. त्या कागदपत्रांमधून एपस्टाईन प्रकरणाशी संबंधित भारतासंदर्भातील माहिती समोर येणार असून, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप संदर्भात धक्कादायक माहिती असण्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. ही माहिती अत्यंत स्फोटक असून अंधभक्तांना कायमच्या कोमात पाठवणारी असेल, असा दावा त्यांनी केला.
या पार्श्वभूमीवर भाजपची मोठी फजिती होणार असून कितीही प्रयत्न केले तरी भाजप सत्तेत टिकू शकणार नाही, असे विश्लेषण समोर आले असल्याचे राऊत म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण हे या बाबतीत तज्ज्ञ असून त्यांनी अनेक स्तरांवर काम केले आहे. त्यांची माहिती बरोबर असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळेच आज कोणीतरी म्हणत असेल की अमित शाहांना 102 ताप आला आहे, काहीतरी मोठा स्फोट 19 तारखेला होणार आहे. त्यामुळेच भाजपच्या सर्व खासदारांना दिल्लीत थांबण्यास सांगण्यात आले असून व्हीप जारी झाला आहे आणि सध्या धावाधाव सुरू आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला.



























































