
ऑस्कर 2026 साठी हिंदुस्थानी चित्रपट ‘होमबाऊंड’ची निवड झाली आहे. 98 व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म कॅटेगरीसाठी या चित्रपटाला शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे.
द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्टस् ऍण्ड सायन्सेसने 12 कॅटेगरीमधील शॉर्टलिस्ट जाहीर केल्या. इंटरनॅशनल फीचर फिल्म कॅटेगरीमध्ये 15 चित्रपट शॉर्टलिस्ट झाले असून त्यापैकी अंतिम फेरीत केवळ 5 चित्रपटांची निवड केली जाणार आहे. दिग्दर्शक नीरज घायवान यांच्या ‘होमबाऊंड’ला 98 व्या अकॅडमी अवॉर्ड्सच्या बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म कॅटेगरीत शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे.
चित्रपटाच्या गौरवास्पद कामगिरीबद्दल निर्माता करण जोहरने भावनिक पोस्ट शेअर केली. करण जोहर म्हणाला, ‘होमबाऊंड’चा प्रवास किती अभिमानाचा आणि आनंदाचा आहे, हे शब्दांत सांगणे कठीण आहे. आमच्या फिल्मोग्राफीचा भाग म्हणून या चित्रपटाचा आम्हाला अभिमान आहे. नीरज, आमची स्वप्नं सत्यात उतरवल्याबद्दल धन्यवाद. कान्सपासून ऑस्कर शॉर्टलिस्टपर्यंतचा हा प्रवास अद्भुत होता. संपूर्ण कास्टसाठी प्रेम. ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर यांनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहून आनंद व्यक्त केला. ऑस्कर 2026 साठी अंतिम नामांकन 22 जानेवारी 2026 रोजी जाहीर होणार आहेत. यंदा ऑस्कर सोहळ्याचे सूत्रसंचालन कॉमेडियन कॉनन ओ’ब्रायन करणार असून 15 मार्च 2026 रोजी पुरस्कार सोहळा होणार आहे.





























































