नितीश कुमारांनी हिजाब खेचला! ‘त्या’ महिला डॉक्टरने बिहार सोडला, सरकारी नोकरीत रुजू होण्यास नकार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भरकार्यक्रमात चेहऱयावरील हिजाब खेचल्यामुळे मानसिक धक्का बसलेल्या डॉ. नुसरत परवीन यांनी बिहार सोडले आहे. त्या पश्चिम बंगालला आपल्या कुटुंबीयांकडे परतल्या आहेत. बिहार सरकारच्या सेवेत रुजू न होण्याचाही निर्णय त्यांनी घेतला आहे.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात नितीश यांच्या हस्ते आयुषडॉक्टरांना सरकारी नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यावेळी नुसरत परवीन हिजाब घालून आल्या होत्या. त्यांना पत्र देताना नितीश यांनी स्वतःच्या हाताने नुसरत यांच्या चेहऱ्यावरचा हिजाब बाजूला केला. त्यामुळे सगळेच चकित झाले. या घटनेनंतर नितीश यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. राजकीय नेत्यांनी या प्रकाराचा निषेध केला. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या खासदार सुमैया राणा यांनी नितीश यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे.

योगींच्या मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री संजय निषाद यांनी नितीश कुमार यांचा बचाव करताना वादग्रस्त वक्तव्य केले. ‘मुख्यमंत्री पण माणूसच आहे. असे त्यांच्या मागे लागणे योग्य नाही. फक्त नकाबला स्पर्श केला तर इतकी चर्चा होतेय, कुठे दुसरीकडे स्पर्श केला असता तर काय झाले असते? असे वक्तव्य निषाद यांनी केले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून वाद निर्माण होताच ही गावाकडची बोली असल्याची सारवासारव निषाद यांनी केली.

आता धाडस होत नाही!

शाळा, कॉलेज, घर, मार्केट, सर्वच ठिकाणी मी आजवर हिजाब घालून फिरले आहे. हिजाब आमच्या संस्कृतीचा भाग आहे. खूप कष्टाने मी इथपर्यंत पोहोचले होते. पण आता नोकरी करण्याचे धाडस होत नाही,’ असे नुसरत परवीन यांनी सांगितले.

नितीश यांच्या कार्यक्रमात मीडियाबंदी

या घटनेनंतर वाद निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी नितीश कुमार यांच्या कार्यक्रमात मीडियाला बंदी घालण्यात आली. त्यांच्या पक्षाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही हा कार्यक्रम दाखवण्यात आला नाही.