छत्तीसगडमध्ये सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 3 नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील गोलापल्लीच्या जंगल परिसरात गुरुवारी डीआरजी जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 3 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांना गोलापल्लीच्या जंगलात नक्षलवादी असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली. नक्षलवाद्यांना त्याची माहिती मिळताच त्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरु केला. त्यांनीही प्रत्योत्तर देत गोळीबार केला. यामध्ये तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून त्यात एका महिलेचा समावेश होता. घटनास्थळावरुन काही शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये माडवी जोगा उर्फ मुन्ना, सोढी बंडी आणि नुप्पो बजनी अशी नावे आहेत. हे तिघंही किस्टाराम एरिया कमेटीशी जोडलेला सक्रिय नक्षलवादी होते. माडवी जोगा आणि सोढी बंडी एरिया कमेटीमध्ये एसीएम पदावर होते. तिघांवर 5-5 लाख रुपये बक्षिस जाहीर केले होते.

चकमकीनंतर गोलापल्ली आणि आसपासच्या जंगल पहाडी परिसरात सुरक्षा वाढवली आहे, सुकमा एसपी किरण चव्हाण यावर लक्ष देत असून अभियान पूर्ण झाल्यानंतर याबाबत संपूर्ण माहिती दिली जाणार असल्याचे सांगितले.