
मराठी भाषा वाचवण्यासाठी मराठी शाळा टिकणे गरजेचे आहे. मुंबईत आणि महाराष्ट्रात मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत आहेत. याविरोधात मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने गुरुवारी हुतात्मा चौकापासून मुंबई पालिका मुख्यालयापर्यंत काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आम्ही आमचा निषेध नोंदवणारच, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध माध्यमांच्या 28 शाळा गेल्या तीन वर्षांत बंद पडल्या असून यात तब्बल 17 मराठी शाळांचा समावेश आहे. असे असताना आताही प्रशासनाकडून कारस्थान करून मराठी शाळा बंद पाडण्याचे काम सुरू आहे. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र आंदोलक मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याने आम्ही जमावाने जाणार नाही. चार-सहा जणांचा गट करून हुतात्मा स्मारकाचे दर्शन घेत तिथे अभिवादन करून महापालिका मुख्यालयासमोर जात आमचा निषेध नोंदवणार असल्याने आंदोलकांनी स्पष्ट केले. आम्ही शांततापूर्ण मार्गाने आमचा निषेध नोंदवणार असून पोलिसांनी किंवा कायदा सुव्यवस्थेला बाधा येईल, असे कोणतेही कृत्य करणार नसल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
मराठी भाषा वाचवायची असेल तर मराठी शाळा टिकवणे गरजेचे आहे. शहरात मुद्दाम मराठी माध्यमांच्या शाळा बंद करून त्यांचे खासगीकरण करण्यात येत आहे. याला आमचा विरोध आहे, अशी भूमिकाही मोर्चेकऱ्यांनी स्पष्ट केली. महापालिकेच्या मराठी शाळा जबरदस्तीने बंद पाडणं आणि जागा बळकावणं एवढय़ाच माफक अर्थाचे हे प्रकरण नसून, मुंबईतील खासगी अनुदानित, विनाअनुदानित मराठी शाळांच्या जमिनींवरही हे बुलडोझरराज भविष्यात येणार आहे. या धोरणाविरोधात हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.































































