
नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत टीका केली. सत्तेत असलेल्यांना वेगळा न्याय आणि विरोधकांना वेगळा न्याय दिला जातो, असे सांगत त्यांनी “मिनिस्टर विथ नो पोर्टफोलिओ” ही संकल्पनाच महाराष्ट्रात नवीन मॉडेल असल्याची उपरोधिक टिप्पणी केली. मात्र, काहीतरी शिस्त आली पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणत असतील आणि त्यामागे तथ्य असेल तर त्याचे स्वागतच आहे, असेही त्या म्हणाल्या. हा लढा कुठल्याही एका व्यक्तीसाठी नसून, एका लेकीने आपल्या वडिलांसाठी अनेक वर्षे एकटीने लढलेली ही न्यायाची लढाई आहे. न्याय मिळायला उशीर झाला असला, तरी ‘Justice delayed is justice denied’ हे वास्तव असल्याचे त्यांनी नमूद केले. उद्या पूर्ण आदेश आल्यानंतरच खरी परिस्थिती स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिवंगत राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबाशी असलेल्या वैयक्तिक व जिव्हाळ्याच्या संबंधांचा उल्लेख करत भावना व्यक्त केल्या. राजीव गांधींच्या निधनाच्या काही दिवस आधी त्यांच्याशी संवाद झाला होता, तो प्रसंग आजही आठवतो आणि तो आमच्यासाठी वैयक्तिक धक्का होता, असे त्या म्हणाल्या. प्रज्ञा ठाकूर यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि काँग्रेस विचारधारेशी या कुटुंबाचे दीर्घकाळचे नाते राहिले असल्याचे नमूद केले. एक सशक्त लोकशाही टिकण्यासाठी मजबूत विरोधक, चेक्स अँड बॅलन्स आवश्यक आहेत, मात्र सध्याच्या परिस्थितीत लोकशाही टिकेल की नाही, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पुढील काही दिवसांत राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका पातळीवर राजकीय समीकरणे नेमकी कशी जुळतात, हे स्पष्ट होईल, असेही त्या म्हणाल्या.
काल धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्यांच्यावर गंभीर आरोप झाले, ज्यांचा राजीनामा सरकारनेच घेतला, अशा व्यक्तीला भेट देणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी आम्ही अमित शहांकडे गेलो होतो, त्याच गृहमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना वेळ देणे मनाला वेदना देणारे आहे, असे त्या म्हणाल्या. सत्तेत असलेला आमदार कामासाठी दिल्लीला गृहमंत्र्यांकडे येत असेल, तर हेच राज्यातील प्रशासन अपयशी असल्याचे द्योतक आहे, असे मत त्यांनी मांडले. सहकाराशी संबंधित काम असेल, तर राज्यातील सहकार मंत्री काय करत आहेत, आणि गृहमंत्रालयाशी संबंधित काम असेल, तर ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांनी तिथे भेट घेणेच चिंताजनक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबांबाबत बोलताना सुळे म्हणाल्या की या दोन्ही कुटुंबांचा संघर्ष केवळ त्यांचा नाही, तर समाजाचा आणि माणुसकीचा प्रश्न आहे, असे सांगत त्यांनी “ही लढाई राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकीसाठी लढली पाहिजे,” असे ठामपणे सांगितले. माध्यमांनी या प्रकरणांचा सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल त्यांनी आभार मानले आणि आता आम्ही कोणतीही किंमत मोजून या कुटुंबांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन दिले. अमित शहांकडून जास्त अपेक्षा होत्या, त्या अपेक्षा भंग पावल्याने दुःख झाले, असेही त्या म्हणाल्या. महादेव मुंडे कुटुंबावर झालेला अन्याय आणि तीन मुलांसह न्यायासाठी फिरणारी आई पाहिली की अंतःकरण हेलावून जाते, असे त्यांनी नमूद केले.
याचवेळी नवाब मलिक यांच्या प्रकरणावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजपवर सोयीस्कर राजकारणाचा आरोप केला. “नवाब मलिक यांची लेक चालते, पण नवाब मलिक चालत नाहीत,” अशी उपरोधिक टीका करत त्यांनी नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबावर होत असलेल्या अन्यायाचा निषेध केला. नवाब मलिक कुठेही असोत, जेलमध्ये असोत किंवा न्यायालयात, मी नेहमी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभी राहीन, असे त्यांनी स्पष्ट केले.
महिलांवरील अत्याचारांबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली. ईश्वरपूर, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत आणि हा दावा त्यांचा नसून केंद्र सरकारच्याच डेटावर आधारित आहे. हुंडाबळी, बलात्कार आणि महिलांवरील अन्याय वाढत असल्याची गंभीर स्थिती असल्याचे त्या म्हणाल्या. नाशिकमधील पर्यावरण प्रश्न आणि झाडे वाचवण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे कौतुक करत त्यांनी कुंभमेळ्याच्या तयारीबाबतही प्रश्न उपस्थित केले. निवडणुकांनंतर राज्य सरकारने नाशिकमधील परिस्थितीचा गांभीर्याने आढावा घ्यावा आणि तेथील अधिकाऱ्यांनी नाशिककरांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.




























































