
चित्रपटसृष्टीत नेहमीच नायकाचा बोलबाला असतो, पण सध्या प्रदर्शित झालेला ‘धुरंधर’ हा चित्रपट वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय खन्ना याने साकारलेला खलनायक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात मूळ नायकापेक्षा अक्षय खन्नाच्या अभिनयाची आणि त्याच्या करारी भूमिकेची चर्चा जास्त रंगताना दिसत आहे.
जेव्हा ‘व्हिलन’ ठरतो चित्रपटाचा चेहरा हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात असे अनेक चित्रपट आहेत जिथे खलनायकाचे व्यक्तिमत्त्व नायकापेक्षा जास्त प्रभावशाली ठरले आहे. मग तो ‘मिस्टर इंडिया’मधील अजरामर ‘मोगॅम्बो’ असो किंवा ‘शान’मधील हायटेक ‘शाकाल’. या भूमिकांनी केवळ नायकाला आव्हान दिले नाही, तर प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे खेचून आणले.
नावात आणि कामातही ‘खलनायक’ची चर्चा
काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘गझनी’ चित्रपटाचे उदाहरण बोलके आहे. या चित्रपटाचा नायक आमीर खान असला तरी चित्रपटाचे नाव मात्र खलनायकाच्या नावावरून (गझनी) ठेवले गेले होते आणि तो चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. तसेच ‘डर’ चित्रपटात शाहरुख खानने साकारलेला वेडा प्रेमी असो, ‘पानिपत’मधील अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत दिसलेला संजय दत्त असो किंवा अलीकडेच ‘शैतान’मध्ये आपल्या थरारक अभिनयाने प्रेक्षकांना घाबरवणारा आर. माधवन असो; या सर्वांनी ‘हिरो’च्या तोडीस तोड लोकप्रियता मिळवली.
सध्याच्या काळात प्रेक्षक केवळ पडद्यावरचा चांगुलपणा पाहत नाहीत, तर भूमिकेची खोली आणि कलाकाराचा अभिनय पाहतात. त्यामुळेच ‘धुरंधर’मधील अक्षय खन्नाच्या निमित्ताने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, जर खलनायक भक्कम असेल, तर चित्रपट प्रेक्षकांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहतो.


























































