
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे एसआयआरवरून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर सातत्याने टीका करत आहेत. आता पुन्हा एकदा अखिलेश यादव यांनी एसआयआरबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले आहेत की, “हे एसआयआर नाही तर एनआरसी आहे. उद्या ते कोणती कागदपत्रे मागतील, हे कोणालाही माहिती नाही. खरं तर, निवडणूक आयोग भाजपशी संगनमत करत आहे.” माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
अखिलेश यादव म्हणाले की, “मुख्यमंत्री स्वतः म्हणत आहेत की ४ कोटी मते कापली जात आहेत. ते एसआयआरच्या बहाण्याने कट रचत आहेत. हे एसआयआर नाही तर एनआरसी आहे, ते हे काम निवडणूक आयोगाकडून करून घेत आहेत.”
ते म्हणाले, “शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून रांगेत उभे आहेत, पण खत कुठे आहे? आज शेतकऱ्यांना खतासाठी भटकंती करावी लागत आहे. तरीही सरकार ते पुरवू शकत नाही. सरकार खतावरील प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ करत आहे, म्हणूनच त्यांना वंदे मातरम् आठवत आहे.”


























































