
अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या ‘एपस्टिन फाइल्स’ शुक्रवारी अखेर खुल्या होणार आहेत. तब्बल 95 हजार फोटो, बँकांचे रेकॉर्डस् आणि प्रभावशाली नेत्यांची नावे यात असून या फाइल्समधून अनेक गुपिते चव्हाटय़ावर येणार आहेत. अनेकांचे खरे चेहरे जगापुढे येणार आहेत. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यासह विविध देशांतील बडय़ा लोकांचे एपस्टिनशी संबंध होते. त्यामुळे एपस्टिन फाइल्सची उत्सुकता वाढली असून हिंदुस्थानातही उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
जेफ्री एपस्टिन हा उद्योजक नव्वदच्या दशकात अमेरिकेत अचानक प्रकाशझोतात आला. तो मानवी तस्करी व अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा व्यापार करत असल्याचे नंतर आढळून आले. हनी ट्रपच्या माध्यमातून त्याने जगातील अनेक नामवंतांना जाळ्यात ओढले होते व त्यांच्या व्हिडीओ रेकॉर्ड्सही बनवल्या होत्या. अटकेनंतर तुरुंगात त्याचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यावरून जोरदार वादळ निर्माण झाले व एपस्टिन फाइल्स खुल्या करण्याची मागणी होऊ लागली. जनतेचा रेटा लक्षात घेऊन ट्रम्प यांनी मागील महिन्यात या फाइल्स खुल्या करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्या समोर येत आहेत. एपस्टिनने कोणाच्या साथीने अल्पवयीन मुलींचे शोषण केले, या सगळ्याची मोडस ऑपरेंडी काय होती हे यातून स्पष्ट होणार आहे.
आतापर्यंत समोर आली ‘ही’ नावे
एपस्टिन प्रकरणात आतापर्यंत 9 बडय़ा लोकांची नावे समोर आली आहेत. त्यात डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन, बिल गेट्स, प्रिन्स ऍण्ड्रय़ू, स्टीव्ह बॅनन, लॅरी समर्स, वुडी एलन, रिचर्ड ब्रॅन्सन, एलन डर्शोविट्ज यांचा समावेश आहे. या सगळ्यांचे फोटो एपस्टिनसोबत आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल संशय असला तरी ते गुन्हेगार ठरलेले नाहीत.
काय उघड होणार?
- जेफ्री एपस्टिनच्या फाइल्स
- एपस्टिनची प्रेयसी गिस्लेन मॅक्सवेलच्या फाइल्स
- एपस्टिनच्या परदेश प्रवासाची माहिती
- फॉरेन्सिक रिपोर्ट्स
- एपस्टिनच्या मृत्यूशी संबंधित कागदपत्रे
- एपस्टिनशी संबंधित सर्व व्यक्ती व कंपन्यांची नावे
‘या’ गोष्टी गुपितच राहणार
- पीडितांची ओळख
- अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाशी संबंधित साहित्य
- शारीरिक हिंसा दाखवणारे साहित्य
- चौकशीवर परिणाम करणारी माहिती
- राष्ट्रीय सुरक्षा किंवा परदेश धोरणाच्या दृष्टीने संवेदनशील माहिती
अनेक गुपिते चव्हाटय़ावर येणार, हिंदुस्थानातही उलथापालथ होण्याची शक्यता, 15 दिवसांत चित्र स्पष्ट होणार
मागच्या 20 वर्षांत एपस्टिनच्या अनेक काळ्या कारनाम्यांची कागदपत्रे न्यायालयीन सुनावणीत समोर आली आहेत. त्यामुळे आता उर्वरीत माहिती समोर येणार आहे. सरकारी अधिकारी व राजकीय नेत्यांची यादी यात असेल. प्रतिमा मलिन होईल किंवा राजकीय अडचण होईल म्हणून कोणाचेही नाव लपवले जाणार नाही. फाइल खुल्या झाल्यानंतर पुढच्या 15 दिवसांच्या आत ही सर्व माहिती द्यावी लागणार आहे.




























































